वॉशिंग्टन : शनी ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र असलेल्या ‘टायटन’बाबत एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. नव्या संशोधनानुसार, टायटनच्या गोठलेल्या पृष्ठभागाखाली जीवसृष्टीला पूरक ठरू शकेल, असा ‘चिखलयुक्त बर्फाचा’ समुद्र असू शकतो. या शोधामुळे परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2008 मध्ये नासाच्या ‘कॅसिनी’ अंतराळ यानाने पाठवलेल्या माहितीवरून असा अंदाज वर्तवण्यात आला होता की, टायटनच्या थराखाली एक विशाल महासागर दडलेला असू शकतो. मात्र, ‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकात 17 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ताज्या विश्लेषणानुसार, तिथे मुक्त महासागर नसून बर्फाळ पाण्याने बनवलेले बोगदे आणि बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचे साठे असू शकतात. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक बाप्टिस्ट जर्नाक्स यांनी सांगितले की, ‘हे पृथ्वीवरील महासागरांसारखे नसून आर्क्टिकमधील समुद्रातील बर्फ किंवा जमिनीखालील जलधरांसारखे असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तिथे कोणत्या प्रकारची जीवसृष्टी असू शकते आणि त्यांना आवश्यक पोषक तत्त्वे कशी मिळतात, यावर होईल.‘
1997 मध्ये प्रक्षेपित झालेल्या ‘कॅसिनी’ यानाने शनीच्या कक्षेत 20 वर्षे घालवून महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली होती. कॅसिनीने टायटनचा आकार ‘लवचिक’ असल्याचे आणि तो शनीभोवती फिरताना काहीसा दबला जात असल्याचे टिपले होते. शास्त्रज्ञांच्या मते, जर टायटनच्या आत पाण्याचा साठा असेल, तरच शनीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या पृष्ठभागावर असा ताण येऊ शकतो.
या संशोधनाचे मुख्य लेखक फ्लेविओ पेट्रिक्का यांच्या मते, शनीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडल्यानंतर सुमारे 15 तासांनी टायटनचा आकार बदलण्यास सुरुवात होते. यावरून असे दिसून येते की, टायटनच्या अंतर्गत भागाची रचना यापूर्वी समजल्या जाणार्या रचनेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हा वेगळा निष्कर्षच तिथे पाण्याचा अंश किंवा अर्धवट वितळलेला बर्फ असल्याचे सिद्ध करणारा मोठा पुरावा ठरला आहे. पाणी हा जीवसृष्टीचा मुख्य आधार असल्याने, टायटनवरील हा शोध भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.