वॉशिंग्टन : ज्यावेळी आईच्या गर्भात दोन भ्रूण एकमेकांना चिकटून वाढतात किंवा एकमेकांच्या शरीराच्या आधारे वाढतात त्यावेळी सयामी जुळी जन्माला येतात. छातीला किंवा पोटाला जुळलेले अनेक सयामी जुळे आहेत. भारतात असेच सयामी जुळे भाऊ आहेत जे सध्या इलेक्ट्रिशियनचे काम करत स्वतच्या पायावर उभे राहिलेले आहेत. काही जुळ्यांना शस्त्रक्रियेने वेगळे करण्यातही यश आलेले आहे. मात्र या प्रयत्नात काहींचे प्राणही गेले. इराणमधील सयामी जुळ्या बहिणींचाही असाच मृत्यू झाला होता. आता अमेरिकेतील सयामी जुळ्या भगिनींना आपल्या स्वप्नातला राजकुमार भेटला आहे. या बहिणींनी त्याच्याबरोबर नुकतेच लग्न केले.
या बहिणींची नावे एबी हॅन्सेल आणि ब्रिटनी अशी आहेत. या दोघी 1996 मध्ये ऑप्रा विन्फे शोमध्येही झळकल्या होत्या. आता त्यांनी जोश बॉलिंग नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. हा माणूस अमेरिकन सैन्यात पुरुष नर्स म्हणून काम करतो. हॅन्सेलच्या फेसबुक प्रोफाईलवर त्यांच्या लग्नाचा फोटो पाहायला मिळत आहे. या दोघी सयामी जुळ्या बहिणींनी जोश बॉलिंगशी लग्न केले आहे. फोटोत दिसतंय की या दोघींनी पांढरे वेडिंग गाऊन परिधान केले आहेत, तर जोश ग्रे सूटमध्ये समोर उभा आहे.
फोटोमध्ये ते एकमेकांना मिठी मारतानाही दिसत आहेत. या जुळ्या बहिणी सध्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत, त्या पाचव्या वर्गातील मुलांना शिकवतात. बॉलिंगच्या फेसबुक पेजवर या दोघींबरोबरचे काही फोटो आहेत. त्यापैकी एका फोटोत तो या जुळ्या बहिणींसह आईस्क्रीमचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे, ज्यात हे तिघेही डान्स करताना दिसतात.