Healthy Diet Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी फळे खावीत का?  
विश्वसंचार

Healthy Diet Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी फळे खावीत का?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः आजकाल मधुमेह टाळण्यासाठी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातून साखर वर्ज्य करण्याचा ट्रेंडच सुरू आहे. पण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहावी किंवा एक निरोगी आहार म्हणून फळांचे सेवन केले जाते. साखर, मिठाई, चॉकलेट यापासून दूर राहणे आरोग्यासाठी चांगले असले, तरी त्याऐवजी गोड म्हणून फळे खाणे अडचणीत टाकू शकते. तज्ज्ञांच्या मते, फळे आरोग्यदायी असली तरी ती जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वाढण्याचा धोका निर्माण होतो.

तज्ज्ञ सांगतात, बहुतेक फळांमध्ये नैसर्गिक साखर (फ्रु क्टोज) असते. केळी, आंबा, द्राक्ष, चिकू, सीताफळ यांसारख्या गोड फळांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. विशेषतः मधुमेह असणार्‍या लोकांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रिफाइंड साखर टाळण्यासाठी गोड फळांचे सेवन करणे हा एक आरोग्यदायी पण धोकादायक निर्णय असू शकतो. पण तुम्ही गोड फळांचे सेवन योग्य त्या प्रमाणात केल्यास फायदेशीर ठरू शकते.

याशिवाय अनेकजण फळांचा रस किंवा सरबत पिणे अधिक आरोग्यदायी समजतात. मात्र, जेव्हा फळांचा रस बनवताना फक्त रस उपयोगात आणला जातो आणि फळांचा चोथा फेकून दिला जातो. सफरचंद, संत्रे, चिकू, पेरू अशा अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे पोटाच्या आरोग्यासाठी तसेच संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. फळांच्या रसामध्ये साल नसल्याने त्यात फायबर नसून फक्त साखर असते. ही साखर थेट रक्तात जाते.

त्यामुळे अनेक जणांनी त्यांच्या आहारातून साखर पूर्णपणे वर्ज केली असली तरी त्यांना मधुमेह होण्याची शक्यता वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फळे योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर एक वाटी फळे खाणे योग्य मानले जाते. रात्री उशिरा किंवा सतत फळे खात राहणे टाळायला हवे. तसेच, फळांसोबत काही प्रमाणात ड्रायफ्रुटस् घेतल्यास शुगर नियंत्रित राहते. पण सतत किंवा फक्त फळे खाणे टाळायला हवे. तसेच तुम्हाला डाएट किंवा उत्तम आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करायचा असेल तर अनुभवी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT