लंडन : मानवी शरीर ही निसर्गाची सर्वात अद्भुत रचना मानली जाते. परंतु, आपले डोळे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे का आहेत? या प्रश्नाने शास्त्रज्ञांना दीर्घकाळ कोड्यात टाकले होते. आता स्वीडन आणि बि—टनच्या ससेक्स विद्यापीठातील संशोधकांनी या रहस्याचा उलगडा केला असून, करोडो वर्षांपूर्वी पृष्ठवंशीज जीवांचे पूर्वज ‘एकडोळी’ होते, असा निष्कर्ष काढला आहे. विशेष म्हणजे उत्क्रांतीच्या टप्प्यात निर्माण झालेल्या कपाळाच्या मध्यभागी असलेल्या ‘डोळ्या’चे अवशेष आजही मानवामध्ये अस्तित्वात असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
संशोधनानुसार, सुमारे 60 कोटी वर्षांपूर्वी आपले पूर्वज समुद्राच्या तळाशी राहणारे लहान, अळीसारखे जीव होते. हे जीव एकाच ठिकाणी राहून प्लँक्टन गाळून खायचे. सुरुवातीला या जीवांना दोन डोळे असावेत, असा अंदाज आहे. मात्र, जेव्हा त्यांनी सक्रिय जीवन सोडून दिले, तेव्हा उत्क्रांतीच्या ओघात त्यांचे दोन्ही डोळे नष्ट झाले. दोन डोळे गेल्यानंतर डोक्याच्या मध्यभागी प्रकाशाची जाणीव करून देणार्या पेशींचा एक समूह उरला. यातूनच ‘मीडियन आय’ (मध्यभागी असलेला डोळा) विकसित झाला. हा डोळा स्पष्ट पाहू शकत नव्हता, तरीही प्रकाश आणि अंधार यातील फरक ओळखण्यास मदत करायचा.
करोडो वर्षांनंतर जेव्हा आपले पूर्वज पुन्हा सक्रिय झाले आणि शिकार करू लागले, तेव्हा त्यांना अंतर मोजण्यासाठी आणि स्पष्ट पाहण्यासाठी दोन डोळ्यांची गरज भासू लागली. याच एका डोळ्याच्या भागातून पुन्हा दोन नवीन डोळ्यांची निर्मिती झाली. मानवी डोळ्यांचा ‘रेटिना’ मेंदूच्या ऊतींपासून विकसित झाला आहे, तर कीटकांचे डोळे त्यांच्या त्वचेपासून तयार होतात. म्हणूनच आपली द़ृष्टी इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. प्राध्यापक डॅन-ई निल्सन यांच्या मते, या शोधामुळे डोळे आणि मेंदूच्या विकासाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलला आहे. जर आपले पूर्वज त्या ‘एकडोळी’ अवस्थेतून गेले नसते, तर कदाचित आज आपल्या डोळ्यांची रचना आणि कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी असती.
शरीरात आजही ’तिसरा’ डोळा!
संशोधनातील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, तो प्राचीन ‘एक डोळा’ आजही आपल्या शरीरात अस्तित्वात आहे. काळानुसार तो डोळा डोक्याच्या पृष्ठभागावरून मेंदूच्या आत गेला असून, त्याला आज आपण ‘पिनिअल ग्लँड’ (Pineial Gland)) म्हणून ओळखतो. ही ग्रंथी मेलाटोनिन संप्रेरक तयार करते. हे संप्रेरक आपल्या झोपण्याच्या आणि जागे होण्याच्या चक्रावर (Sleep Cycle) नियंत्रण ठेवते. म्हणजेच, तुमच्या आजच्या झोपेचा संबंध त्या करोडो वर्षांपूर्वीच्या समुद्री जीवाशी आहे.