वॉशिंग्टन : अमेरिकेतील ओहायो राज्यातील क्लीव्हलँडमध्ये नुकतेच एका शक्तिशाली उल्कापिंडाने सर्वांनाच धक्का दिला. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका प्रचंड मोठ्या आवाजाने लोक हादरून गेले. हा आवाज एखाद्या शक्तिशाली बॉम्बस्फोटासारखा होता. विशेष म्हणजे हा उल्कापिंड भरदिवसा आकाशात दिसून आला, जे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. नासाच्या ‘मेटेरॉयड एन्व्हायर्नमेंट ऑफिस’ने दिलेल्या माहितीनुसार, या उल्कापिंडाचा व्यास सुमारे 6 फूट आणि वजन तब्बल 7 टन होते. हा दगड ताशी 72,400 किलोमीटर या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरला.
हा अग्निगोळा सर्वप्रथम लेक एरीच्या 80 किमी वर दिसला आणि दक्षिण पूर्वेकडे सरकत ओहायोच्या 48 किमीवर असताना त्याचे तुकडे झाले. नासाच्या अंदाजानुसार, हवेत जेव्हा हा उल्कापिंड फुटला, तेव्हा त्यातून 250 टन टीएनटी स्फोटकांव्यतिरिक्त निघणार्या ऊर्जेइतका मोठा धमाका झाला. हा स्फोट एखाद्या मोठ्या ‘मिलिटरी ग्रेड’ धमाक्यासारखा होता. याची चमक इतकी तीव्र होती की, वॉशिंग्टन डीसीसह अमेरिकेतील 10 राज्ये आणि कॅनडातील ओंटारियो प्रांतातूनही लोकांनी हा अग्निगोळा पाहिला. हा खरोखरच एका विशाल अग्निगोळ्यासारखा दिसत होता, असे अमेरिकन मेटिओर सोसायटीचे कार्यकारी संचालक कार्ल हर्गेनरोथन यांनी सांगितले.
क्लीव्हलँडमधील हवामान विभागाच्या कर्मचार्यांनीही या धमाक्याचे कंपन अनुभवले. या घटनेतील सर्वात भीतीदायक बाब म्हणजे, इतका मोठा दगड पृथ्वीच्या इतक्या जवळ येईपर्यंत कोणत्याही एजन्सीला त्याची साधी चाहूलही लागली नाही. नासा आणि इतर संस्था पृथ्वीच्या जवळून जाणार्या प्रत्येक वस्तूंवर लक्ष ठेवतात. मात्र हा लघुग्रह ‘प्लॅनेटरी डिफेन्स सिस्टीम’ला चकवा देऊन थेट वातावरणात घुसला. कोणत्याही पूर्वसूचना किंवा चेतावणीशिवाय 250 टन टीएनटी क्षमतेचा धमाका करणारा एखादा दगड लोकवस्ती असलेल्या भागात कोसळला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती. यामुळे भविष्यातील सुरक्षेबाबत संशोधकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.