वॉशिंग्टन : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला वाचवण्यासाठी सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात. आता अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांना मदत करण्यासाठी शास्त्रज्ञ एका ‘सेल्फ-ड्रायव्हिंग’ मशिनवर काम करत आहेत. हे यंत्र केवळ रुग्णावर उपचारच करणार नाही, तर त्यांच्या शरीराचा प्रतिसाद पाहून औषधांच्या मात्रेत आपोआप बदलही करेल.
‘एनटीटी’ या जागतिक तंत्रज्ञान कंपनीच्या संशोधन शाखेने ‘ऑटोनॉमस क्लोज्ड-लूप इंटरव्हेंशन सिस्टम’ (ACIS) विकसित केली आहे. हे यंत्र एखाद्या अनुभवी डॉक्टरप्रमाणे काम करते. हे यंत्र रुग्णाला आवश्यक औषधे देते आणि शरीरातील बदलांची आकडेवारी (डाटा) गोळा करते. डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या निकषांनुसार, हे यंत्र औषधांचे प्रमाण कमी-जास्त करून रुग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. हृदयविकारानंतरच्या नाजूक काळात हृदयावरचा ताण कमी करणे आणि ऑक्सिजनचा वापर किमान पातळीवर नेणे हे या यंत्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या ही कामे डॉक्टर किंवा परिचारिका करतात. मात्र, हे यंत्र ही प्रक्रिया अधिक अचूक आणि वेगवान करेल. यामुळे रुग्णालयातील साधनसामग्री आणि डॉक्टरांवरील ताणही कमी होईल.
‘आम्हाला विश्वास आहे की ही प्रणाली सध्याच्या पारंपरिक उपचार पद्धतीपेक्षा अधिक सरस कामगिरी करेल,’ असे ‘एनटीटी रिसर्च’चे संचालक डॉ. जो अलेक्झांडर यांनी सांगितले. हे यंत्र तयार करण्यासाठी ‘बायो डिजिटल ट्विन’ या मोठ्या प्रकल्पाची मदत घेण्यात आली आहे. यामध्ये मानवी अवयवांचे प्रगत आभासी मॉडेल तयार केले जातात. रुग्णाच्या स्वतःच्या माहितीचा वापर करून हे मॉडेल त्याच्या आरोग्याची अचूक स्थिती दर्शवते, ज्यामुळे उपचार करणे सोपे होते. सध्या या यंत्राची प्राण्यांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. मानवी रुग्णांवर याची चाचणी अद्याप होणे बाकी आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात आरोग्य सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणू शकते. विशेषतः, आपत्कालीन परिस्थितीत जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो.