बीजिंग : जगात अनेक प्रकारचे विचित्र आणि अद्भुत ह्युमनॉइड रोबो उपलब्ध आहेत; परंतु या वर्षी सादर झालेल्या एका रोबोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा रोबो स्वतःचा बॅटरी पॅक स्वतःच बदलू शकतो, ज्यामुळे तो आठवड्याचे सातही दिवस, 24 तास स्वायत्तपणे काम करण्यास सक्षमआहे.
चीनच्या ‘UBTECH’ कंपनीने बनवलेला ‘वॉकर S2’ नावाचा हा रोबो 5 फूट 3 इंच (162 सेंटिमीटर) उंच असून, त्याचे वजन 95 पाऊंड (43 किलोग्राम) आहे. म्हणजेच, त्याचा आकार आणि वजन एखाद्या सामान्य प्रौढ व्यक्तीसारखे आहे. हा रोबो 48-व्होल्ट लिथियम बॅटरी आणि ड्युअल-बॅटरी प्रणालीवर चालतो. एकदा चार्ज केल्यावर तो दोन तास चालू शकतो किंवा चार तास स्थिर उभा राहू शकतो. त्याची बॅटरी पूर्णपणे संपल्यावर पुन्हा चार्ज होण्यासाठी 90 मिनिटे लागतात. मात्र, याचे सर्वात विशेष वैशिष्ट्य म्हणजे, बॅटरी बदलण्यासाठी त्याला कोणत्याही माणसाची गरज लागत नाही; तो हे काम स्वतःच करू शकतो. UBTECH च्या प्रतिनिधींनी हा जगातला पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला आहे.
17 जुलै रोजी यूट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये, वॉकर ड2 रोबो आपला बॅटरी पुरवठा बदलण्यासाठी चार्जिंग स्टेशनजवळ जाताना दिसतो. तो स्टेशनकडे पाठ करून उभा राहतो आणि आपल्या हातांनी पाठीमागे बसवलेला बॅटरी पॅक काढतो. त्यानंतर, तो रिकामा बॅटरी पॅक चार्जिंगसाठी एका रिकाम्या स्लॉटमध्ये ठेवतो आणि चार्ज केलेला नवीन बॅटरी पॅक उचलून स्वतःच्या पोर्टमध्ये बसवतो. चीनमधील ‘CnEVPost’ या प्रकाशनाने कंपनीच्या प्रतिनिधींच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या रोबोमध्ये ऊर्जेची पातळी ओळखण्याची क्षमता आहे. आपल्या कामाच्या प्राधान्यानुसार, बॅटरी बदलायची की चार्ज करायची, याचा निर्णय तो स्वतःच घेऊ शकतो. या रोबोमध्ये 20 ‘डिग्री ऑफ फ्रीडम’ (हालचाल करण्याची क्षमता) असून, तो वाय-फाय आणि ब्लूटूथशी सुसंगत आहे.