Earthquake Rescue Survivor | भूकंपाच्या आठ दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून सुरक्षारक्षक जिवंत बाहेर  
विश्वसंचार

Earthquake Rescue Survivor | भूकंपाच्या आठ दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून सुरक्षारक्षक जिवंत बाहेर

पुढारी वृत्तसेवा

कॅराकॅस : व्हेनेझुएलामध्ये आलेल्या दोन भीषण भूकंपांनंतर एक असा चमत्कार घडला आहे, जो पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. ४३ वर्षांचे सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) हरनान अल्बर्टो गील फ्लोर्स हे तब्बल १४० टन वजनाच्या ढिगाऱ्याखाली पूर्ण आठ दिवस दबलेले होते. त्यानंतर चाललेल्या १०० तासांच्या अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण रेस्क्यू ऑपरेशननंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

हा अपघात व्हेनेझुएलातील एका शॉपिंग सेंटरमध्ये घडला, जे भूकंपाच्या धक्क्याने पूर्णपणे कोसळले होते. हरनान तिथे नाईट शिफ्टमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. २४ जून रोजी जेव्हा ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन लागोपाठ भीषण भूकंप आले, तेव्हा ते एका छोट्या सुरक्षा केबिनच्या आत होते. आजूबाजूची संपूर्ण काँक्रीटची इमारत पत्त्यांसारखी कोसळली; पण ती छोटी केबिन सुदैवाने सुरक्षित राहिली. याच केबिनने त्यांच्यावर थेट ढिगारा पडू दिला नाही आणि त्यांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा (एअर पॉकेट) मिळाली. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा रेस्क्यू टीमने हरनान यांना स्ट्रेचरवरून बाहेर काढले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. धुळीने माखलेल्या हरनान यांना ऑक्सिजन मास्क लावून तातडीने रुग्णवाहिकेकडे नेण्यात आले.

या यशानंतर विविध देशांतून आलेल्या बचावकर्त्यांनी आनंदाने एकच जल्लोष केला. कोस्टा रिकाच्या एका बचावकर्त्याने सांगितले की, जेव्हा त्यांनी ढिगाऱ्याखाली हरनान यांना पहिल्यांदा शोधले, तेव्हा हरनान यांनी अतिशय हळव्या स्वरात सांगितले होते, ‘माझ्या पत्नीला मी जिवंत असल्याचं आताच सांगू नका, कदाचित मी बाहेर येऊ शकलो नाही तर...’ पण बचाव पथकाने त्यांना कोणत्याही परिस्थितीत जिवंत बाहेर काढण्याचा निश्चय केला होता आणि तो पूर्ण करून दाखवला. सामान्यतः भूकंपानंतरचे ४८ ते ७२ तास हेच जीव वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जातात. मात्र, हे रेस्क्यू ऑपरेशन त्याहून खूप जास्त काळ चालले. ढिगाऱ्यातील काँक्रीट बाजूला करत असताना, बचाव पथकाने अत्यंत हुशारीने एका बारीक पाईपच्या मदतीने हरनान यांच्यापर्यंत पाणी आणि लिक्विड फूड (द्रवरूप अन्न) पोहोचवले होते. यामुळेच ते इतके दिवस मृत्यूशी झुंज देऊ शकले. हरनान यांची पत्नी गुस्बीमार गोन्झालेझ यांनी सांगितले की, त्यांनी पतीच्या जगण्याची आशा पूर्णपणे सोडली होती. परंतु, जेव्हा पती जिवंत असल्याची बातमी मिळाली, तेव्हा अंधाऱ्या आयुष्यात प्रकाशाचा किरण आल्यासारखे वाटले. हरनान यांना दोन मुले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT