जॉर्डनमधील पेट्रा येथे पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात एक कबर आढळून आली. Pudhari File Photo
विश्वसंचार

पेट्रामध्ये प्राचीन कबरीसह बारा सांगाड्यांचा शोध

पुढारी वृत्तसेवा

लंडन : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणार्‍या जॉर्डनमधील पेट्रा येथे पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात एक कबर आढळून आली. ही कबर जागतिक वारसास्थळ असणार्‍या ट्रेजरी इमारतीच्या अल खजनेह इथं सापडली. तिथे 12 सांगाडेही आढळले आहेत. तसेच काही प्राचीन भांड्यांचे अवशेषही इथे आढळले. याचठिकाणी ‘इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड’ यासारख्या चित्रपटांचे शूटिंगही झाले होते.

पेट्रा हे एक प्राचीन शहर असून, वाळवंटातील दर्‍या-खोर्‍यांमध्ये खडकांवर हातांनी कोरीवकाम करून शहर वसवण्यात आल्याचे संदर्भ आढळतात. ‘राकेमे’ अशी या शहराची स्थानिकांमध्ये असणारी ओळख. व्यापाराच्या निमित्ताने स्थलांतर करणार्‍या आणि नाबातियन अरब समुदायानं साधारण इसवीसन पूर्व पाचव्या शतकात हे शहर वसवल्याचं सांगितलं जातं. पेट्राच्या नजीकच्या भागात 9000 वर्षांपासून मानवी वावर आढळतो. याच पेट्रा शहराच्या पोटात नेमकं दडलंय काय, याविषयी संशोधन सुरू असतानाच अतिशय गूढरित्या दडलेली ही कबर समोर आली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंडक्टिविटी आणि रिमोट स्कॅनिंग, ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडारच्या माध्यमातून या कबरीमध्ये नेमकं काय आहे याची माहिती मिळवण्यात आली. ज्यावेळी कबरीची एकंदर संरचना पाहिली गेली तेव्हा इथं तातडीनं उत्खनन सुरू करण्यात आलं. स्कॉटलंडमधील सेंट एंर्ड्यूज यूनिवर्सिटीतील जियोफिजिसिस्ट रिचर्ड बेट्स यांच्या मते, हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन असून, पेट्रा शहर कसं वसलं आणि नाबातियन कोण होते याची उकल होण्यास मदत होणार आहे. इथं एक सांगाडा मातीच्या भांड्याला पकडून असल्याचं दिसून आलं, तर कबरीच्या भिंती पहिल्या शतकाच्या मध्यापासून दुसर्‍या शतकादरम्यानच्या असल्याचं सांगितलं जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT