विश्वसंचार

लवकरच उलगडणार ‘अँटिमॅटर’चे रहस्य

Arun Patil

जीनिव्हा : 'अँटिमॅटर' हा एक असा रहस्यमय घटक आहे जो ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होता. 'अँटिमॅटर'हे 'मॅटर'च्या विरुद्ध आहे. 'मॅटर'पासूनच तारे व ग्रह बनले.'बिग बँग' या महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती व विकासाची प्रक्रिया सुरू झाली असे मानले जाते. या 'बिग बँग'वेळी मॅटर आणि अँटिमॅटर हे दोन्ही समसमान प्रमाणातच निर्माण झाले होते. आता मॅटर हे सर्वत्र पाहायला मिळते, पण त्याच्या विरुद्ध असलेला घटक 'अँटिमॅटर' शोधण्यासही कठीण बनलेला आहे. आता संशोधकांनी या अँटिमॅटरबाबत नवे संशोधन केले असून त्यामध्ये त्यांना आढळले की मॅटर आणि अँटिमॅटर हे दोन्ही गुरुत्वाकर्षणाला सारख्याच मार्गाने प्रतिसाद देतात. या संशोधनामुळे अँटिमॅटरचे रहस्य उलगडण्यास मदत मिळेल.

ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली हे स्पष्ट करीत असताना यापूर्वी भौतिक शास्त्रज्ञांना मॅटर आणि अँटिमॅटरमधील साम्य व फरक दर्शवण्यासाठी झगडावे लागत होते. आता आढळले आहे की गुरुत्वाकर्षणाला प्रतिसाद देत असतानाच अँटिमॅटरचाही उदय झाला. कदाचित खाली पडण्याऐवजी ते उडून गेले असावेत, असेही म्हटले जात होते. मात्र आता प्रथमच याची पुष्टी झाली आहे की अँटिमॅटर हे खालच्या दिशेने कोसळले होते. ते सारख्याच वेगाने कोसळले का? अशा स्वरूपाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता शोधावी लागणार असून त्यासाठी वेगवेगळे सिद्धांतही निर्माण होतील. त्यामुळे या नव्या शोधाने अँटिमॅटरबाबतच्या संशोधनची नवी दालने खुली झाली आहेत.

'बिग बँग'च्या घटनेवेळी मॅटर आणि अँटिमॅटर एकत्रच असावेत व कदाचित एकमेकांना नष्टही करीत असावेत, असे संशोधकांना वाटते. या क्रियेतून अन्य काही नव्हे तर प्रकाशाचीच निर्मिती होत होती. सध्या अँटिमॅटरचे अस्तित्व का दिसत नाही याचे रहस्य भौतिक शास्त्रासाठी गहन बनलेले आहे. ते उलगडण्यासाठी दोन्हीमधील फरक स्पष्ट होणे हाच कळीचा मुद्दा आहे. स्वित्झर्लंडमधील सर्न येथील जगातील सर्वात मोठ्या पार्टिकल फिजिक्स लॅबोरेटरीमधील संशोधक डॉ. डॅनियल होजकिन्सन व त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

अँटिमॅटर म्हणजे काय?

अँटिमॅटर म्हणजे काय हे समजून घेत असताना आधी 'मॅटर'चे स्वरूप समजणे गरजेचे आहे. या जगातील सर्व काही 'मॅटर'पासूनच बनलेले आहे. त्यामध्ये सूक्ष्म अशा अणूंंचा समावेश होतो. सर्वात साधा अणू हा हायड्रोजनचा असतो. सूर्य हा बहुतांशी हायड्रोजननेच बनलेला आहे. हायड्रोजनच्या एका अणूमध्ये केंद्रभागी धनभारीत (पॉझिटिव्हली चार्ज्ड) प्रोटॉन असतो तर त्याच्याभोवती ऋणभारित (निगेटिव्हली चार्ज्ड) इलेक्ट्रॉन फिरत असतो. अँटिमॅटरमध्ये हे भार बरोबर उलटे असतात. उदा. हायड्रोजनचा अँटिमॅटर असलेला अँटिहायड्रोजन. यामध्ये केंद्रभागी ऋ णभारित (निगेटिव्हली चार्ज्ड) प्रोटॉन (अँटीप्रोटॉन) असतो व त्याच्याभोवती धनभारित (पॉझिटिव्हली चार्ज्ड) इलेक्ट्रॉन (पॉझीट्रॉन) फिरत असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT