बर्लिन : विज्ञान जगतात अनेकदा जे दिसते ते सत्य असतेच असे नाही. ‘चकाकते ते सर्व सोने नसते’ ही म्हण जर्मनीमध्ये सापडलेल्या 183 दशलक्ष (सुमारे 18.3 कोटी) वर्षे जुन्या एका रहस्यमयी जीवाश्माच्या बाबतीत तंतोतंत लागू पडली आहे. अनेक दशकांपासून ज्याच्या सोनेरी चकाकीने जगभरातील शास्त्रज्ञांना संभ्रमात टाकले होते, त्याचे सत्य आता एका शक्तिशाली मायक्रोस्कोपमुळे समोर आले आहे.
जर्मनीच्या नैऋत्य भागात ‘ब्लॅक शेल’मध्ये (काळ्या दगडांमध्ये) हे 18.3 कोटी वर्षे जुने जीवाश्म सापडले होते. हे प्रामुख्याने ‘अमोनाईटस्’चे अवशेष आहेत. त्यांची चमक पाहून शास्त्रज्ञांना आतापर्यंत वाटत होते की, या जीवाश्मांचे रूपांतर पायराईट म्हणजेच ‘मूर्खांचे सोने’ ( ऋेेश्र’ ी ॠेश्रव) यामध्ये झाले आहे. जीवाश्मातील सेंद्रिय पदार्थांची जागा पायराईट खनिजाने घेतली असावी, असा तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज होता. नुकतेच ‘स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप’च्या साहाय्याने या जीवाश्मांचे सखोल संशोधन करण्यात आले. त्याचे निकाल आश्चर्यकारक आहेत.
संशोधकांना आढळले की, जीवाश्मामध्ये पायराईटचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. हे जीवाश्म प्रत्यक्षात प्रामुख्याने फॉस्फेट खनिजांनी बनलेले होते. या प्रक्रियेला ‘फॉस्फेटायझेशन’ म्हणतात. जीवाश्म स्वतः सोनेरी नसून, त्याच्या सभोवतालच्या काळ्या खडकात ‘फ्रेमबॉईडस्’ नावाचे लहान पायराईट स्फटिक होते. जेव्हा त्यावर प्रकाश पडतो, तेव्हा ते सोन्यासारखे चमकतात, ज्यामुळे संपूर्ण जीवाश्मच सोन्याचा असल्याचा भास होतो. फॉस्फेटमुळे होणारे जीवाश्मांचे जतन अत्यंत दुर्मीळ मानले जाते. ही प्रक्रिया जीव मृत पावल्यानंतर आणि तो कुजण्यापूर्वीच सुरू होते, ज्यामुळे त्या जीवाच्या शरीराची सूक्ष्म रचनाही सुरक्षित राहते.
हे जीवाश्म अशा काळातील आहेत, जेव्हा पृथ्वीवरील महासागरांमध्ये ऑक्सिजनची तीव्र कमतरता होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विघटन प्रक्रिया मंदावली आणि हे अवशेष सुरक्षित राहिले. विसाव्या शतकाच्या मध्यापासून आतापर्यंत जागतिक समुद्री ऑक्सिजन पातळीत 2 टक्के घट झाली आहे. त्यामुळे या प्राचीन जीवाश्मांचा अभ्यास करून भविष्यात ऑक्सिजनच्या कमतरतेचा समुद्री जीवांवर काय परिणाम होईल, हे समजून घेण्यास शास्त्रज्ञांना मदत होणार आहे.