नवी दिल्ली : प्रत्येकाला आपले स्व:ताचे घर असावे असे वाटत असते. अनेक लोक तर बहुमजली घर बांधणे पसंद करतात, यासाठी ते लाखो रुपये खर्च करण्यास तयार असतात. मात्र, जगात असे एक अनोखे गाव आहे की तेथे गेल्या 700 वर्षांपासून एकाही घराचा दुसरा मजला बांधला गेलेला नाही.
राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील सरदारशहर तहसीलमधील उडसर असे या गावाचे नाव. गेल्या 700 वर्षांपासून या गावात दुसरा मजला न बांधण्याची परंपरा चालत आली आहे. यास एक शाप कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात स्थानिक लोक सांगतात की, आमच्या गावाला 7 शतकांपूर्वी शाप मिळाला होता. यामुळेच गावात दुसरा मजला धाडस करत नाहीत. धाडस तर सोडाच; पण साधा विचारही गावकरी करू शकत नाही. दुसरा मजला बांधल्याने कुटुंबाला धोका निर्माण होतो, अशी येथील लोकांची धारणा आहे.
या अनोख्या आणि आश्चर्य वाटणार्या परंपरेमागे कारणही तसेच ठोस आहे. शेकडो वर्षांपूर्वी या गावात भोमिया नामक व्यक्ती राहत होता. चोरीच्या उद्देशाने गावात आलेल्या चोरट्यांनी भोमियावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले. चोरांच्या भीतीने भोमिया सासरी असलेल्या दुसर्या मजल्यावर लपून बसला. मात्र, चोरांनी तेथेही त्याला सोडले नाही. यातच त्याचा मृत्यू झाला. यामुळे या गावात कोणीही दुसरा मजला बांधणार नाही, असे केल्यास त्यांना फळे भोगावी लागतील, असा शाप त्याच्या पत्नीने दिला.