Pet Owners Search | वाचलेल्या पाळीव प्राण्यांच्या मालकांचा शोध! 
विश्वसंचार

Pet Owners Search | वाचलेल्या पाळीव प्राण्यांच्या मालकांचा शोध!

पुढारी वृत्तसेवा

ला ग्वायरा (व्हेनेझुएला) : कातीरा अलेजांड्रा जेव्हा अनेक दिवसांनंतर आपल्या मालकांना भेटली, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. शेपटी हलवणे, आनंदाने उड्या मारणे आणि मालकाचा चेहरा चाटणे... या तिच्या हालचालींमधून पुन्हा एकत्र येण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीची तिची अवस्था अत्यंत दयनीय होती. व्हेनेझुएलामध्ये जून महिन्यात झालेल्या दोन भीषण भूकंपांनंतर ती थरथर कापत होती. या नैसर्गिक आपत्तीत हजारो लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो नागरिक बेघर झाले आणि त्यांचे लाडके पाळीव प्राणी त्यांच्यापासून दुरावले.

भूकंपानंतर ला ग्वायरा आणि सॅन बर्नार्डिनो भागातून आतापर्यंत सुमारे ६४८ हून अधिक पाळीव प्राण्यांना (कुत्रे आणि मांजरी) वाचवण्यात आले आहे. सरकारी प्रकल्प 'मिशन नेव्हाडो'च्या अध्यक्षा माग्युइल्डास व्हर्गास यांनी सांगितले की, बचावलेले बहुतेक प्राणी गंभीर जखमी होते, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मालक आणि प्राण्यांची गळाभेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 'ग्रँझा लॉस कोरालेस' येथील निवारा केंद्र सध्या अशा प्राण्यांसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

सरकारी प्रयत्नांना खासगी संस्थाही मोलाची साथ देत आहेत. मारिया कोर्डोव्हा ही ३० वर्षीय पेस्ट्री शेफ आपले घरचे काम सांभाळून 'अमोर ॲनिमल' या संस्थेद्वारे या प्राण्यांना मदत करत आहे. मारियाने सांगितले, माझे एकमेव ध्येय या मुक्या प्राण्यांना त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचवणे हेच आहे. अनेक मालक अजूनही रुग्णालयात असल्याने ते शोध घेऊ शकलेले नाहीत, त्यामुळे मी घाईघाईने कोणालाही हे प्राणी दत्तक देणार नाही. नुकतीच तिने वाचवलेला 'गस' नावाचा मांजर १९ दिवसांनंतर त्याच्या मालकिणीला सुखरूप परत मिळाला. या भावूक भेटीने मारियाच्या डोळ्यातही पाणी आणले. नैसर्गिक आपत्तीच्या या भीषण काळामध्ये, अशा प्रकारच्या पुनर्भेट माणसांना आणि प्राण्यांना जगण्याची नवी उमेद देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT