लंडन : समुद्राच्या तळाशी असलेल्या लाव्हा अवशेषांमध्ये कार्बन डायऑक्साईडचा मोठा साठा साठवून ठेवण्याची क्षमता असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हे अवशेष एखाद्या ‘महाकाय स्पंज’प्रमाणे काम करतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, दक्षिण अटलांटिक महासागराच्या तळातून गोळा केलेले पाषाण नमुने असे दर्शवतात की, हे अवशेष महासागराच्या वरच्या थरापेक्षा 2 ते 40 पट अधिक कार्बन डायऑक्साईड साठवू शकतात. कोट्यवधी वर्षांच्या ज्वालामुखी क्रियांतून हे अवशेष तयार झाले आहेत. पृथ्वीच्या वातावरणात आणि कवचात कार्बनचे चक्र सतत सुरू असते. समुद्राच्या तळाशी असलेल्या डोंगररांगांमध्ये जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मात्र, समुद्र केवळ पाण्याचे भांडे नसून तो कार्बन शोषून घेण्याचेही काम करतो.
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या संशोधक आणि सह-लेखिका रोझलिंड कॉगन यांनी सांगितले की, ‘समुद्राचे पाणी कोट्यवधी वर्षे लाव्हाच्या भेगांमधून वाहत असते. या प्रक्रियेत खडकांशी रासायनिक अभिक्रिया होऊन पाण्यातील कार्बन डायऑक्साईड खडकांमध्ये ‘कॅल्शियम कार्बोनेट’च्या स्वरूपात साठवला जातो. ‘खनिजांनी युक्त असलेल्या या लाव्हा अवशेषांना ‘ब्रेकिया’ असे म्हणतात. संशोधकांनी दक्षिण अटलांटिक महासागराच्या 6.1 कोटी वर्षे जुन्या कवचातून हे नमुने ड्रिलिंग करून काढले आहेत.
या खडकांच्या वजनाच्या साधारण 7.5% हिस्सा हा कार्बन डायऑक्साईडपासून बनलेल्या खनिजांचा आहे. पूर्वीच्या नमुन्यांच्या तुलनेत यात 2 ते 40 पट अधिक कार्बन साठलेला आढळला आहे. ज्वालामुखी प्रक्रियेतून बाहेर पडणार्या एकूण कार्बनपैकी सुमारे 20% कार्बन हे खडक स्वतःमध्ये साठवून ठेवू शकतात. कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीचे हवामान कसे बदलले आणि समुद्रातील या प्रक्रियेने वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणावर कसा परिणाम केला, हे समजून घेण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.