वॉशिंग्टन : समुद्राच्या तळातून घेतलेल्या नमुन्यांच्या संशोधनातून शेवटच्या हिमयुगानंतर जागतिक समुद्र पातळी किती वाढली याची स्पष्ट माहिती मिळाली आहे. उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका आणि युरोपमधील हिमशिखरांच्या वितळण्यामुळे, तापमान वाढल्यानंतर समुद्राची पातळी झपाट्याने वाढली. मात्र, या कालखंडातील भौगोलिक पुराव्यांचा अभाव असल्याने पातळी नेमकी किती वाढली होती, हे निश्चित करता आले नव्हते. नवीन भौगोलिक संशोधनानुसार, सुमारे 11,000 ते 3,000 वर्षांपूर्वी समुद्राची पातळी जवळपास 125 फूट (38 मीटर) वाढली.
19 मार्च रोजी ‘नेचर’ या शास्त्रीय जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, हे निष्कर्ष वैज्ञानिक व धोरणकर्त्यांना आजच्या बदलत्या हवामानात हिमखंड वितळल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज घेण्यासाठी मदत करू शकतात. या नोंदी मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या चमूने उत्तर समुद्राच्या उथळ भागातील ‘डॉगरलँड’ परिसराची निवड केली. हा भूभाग सुमारे 7,000 वर्षांपूर्वीपर्यंत यूके आणि उर्वरीत युरोपला जोडणारा पूल होता. संशोधकांनी येथे समुद्राच्या तळाशी असलेल्या अर्धविघटित वनस्पतींच्या (पीट) नमुन्यांचे संकलन केले. हिमयुगाच्या काळात डॉगरलँड हा किनारपट्टीच्या दलदलींचा प्रदेश होता, परंतु समुद्र पातळी वाढल्याने पाणी आणि गाळाच्या थराखाली हा भाग दडपला गेला. संशोधकांनी पीटमध्ये असलेल्या विविध घटक आणि सूक्ष्मशैवालांचे विश्लेषण करून समुद्र पातळीतील बदलांचे आकलन केले. शेवटच्या हिमयुगाच्या समाप्तीनंतर 8,000 वर्षांच्या कालावधीत समुद्राची पातळी दोन टप्प्यांत वाढली. पहिला टप्पा सुमारे 10,300 वर्षांपूर्वी झाला, जो वितळलेल्या हिमशिखरांमुळे निर्माण झालेल्या पाण्यामुळे झाला. दुसरा टप्पा 8,300 वर्षांपूर्वी घडला आणि त्यामध्ये हिम वितळण्यासोबतच बर्फाच्या पृष्टभागावर असलेल्या तलावांचे पाणी समुद्रात मिसळले. समुद्र पातळी वाढीचा वेग एका शतकात सुमारे 40 इंच (1 मीटर) इतका होता. तुलनेत, आंतरराष्ट्रीय हवामान पॅनेलनुसार, सध्या समुद्र पातळी दरवर्षी 0.1 ते 0.2 इंच (3-4 मिमी) वाढत आहे आणि शतकाच्या शेवटी हा वेग 0.2 ते 0.4 इंच (4-9 मिमी) दरवर्षी होण्याची शक्यता आहे.