वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी उंदराच्या नाकातील ’घाणेंद्रिय ग्राही’ (Smell Receptors) म्हणजेच वास ओळखणाऱ्या केंद्रांचा एक सर्वसमावेशक नकाशा तयार केला आहे. या संशोधनातून आपल्या मूलभूत संवेदनांपैकी एक असलेल्या ’वास घेण्याच्या’ प्रक्रियेबद्दल काही आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत.
आतापर्यंत असे मानले जात होते की, नाकाच्या पोकळीमध्ये हे रिसेप्टर्स विखुरलेले असतात. मात्र, ’सेल’ या प्रसिद्ध नियतकालिकात मंगळवारी (२८ एप्रिल) प्रसिद्ध झालेल्या या पहिल्याच प्रकारच्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, हे रिसेप्टर्स अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असतात. उंदरांच्या डीएनए मध्ये वासाचे १,१७२ वेगवेगळे रिसेप्टर्स असतात. शास्त्रज्ञांनी ३०० पेक्षा जास्त उंदरांच्या नाकातील सुमारे ५५ लाख न्यूरॉन्सचा अभ्यास करून हा नकाशा तयार केला आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूलचे न्यूरोबायोलॉजिस्ट डॉ. संदीप दत्ता यांच्या मते, नाकातील या रिसेप्टर्सचा नकाशा मेंदूच्या ’ऑल्फॅक्टरी बल्ब’ (वास प्रक्रिया केंद्र) शी अचूकपणे जुळतो. हे संशोधन करण्यासाठी ’सिंगल-सेल सिक्वेन्सिंग’ आणि ’स्पेशियल ट्रान्सक्रिप्टोमिक्स’ यांसारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करण्यात आला. ‘नाकामध्ये वासाच्या रिसेप्टर्सचे हजारो वेगवेगळे पट्टे असतात, जे एकमेकांवर ओव्हरलॅप होत असले तरी अत्यंत संघटित असतात. नाकातील हा नकाशा मेंदूतील नकाशाशी तंतोतंत जुळतो,‘ असे डॉ. संदीप दत्ता यांनी स्पष्ट केले.
स्पर्श, दृष्टी आणि ऐकणे यांसारख्या संवेदनांसाठी शरीरात विशिष्ट ’नकाशे’ (Sensory Maps) असतात हे माहीत होते. उदाहरणार्थ, कानाच्या अंतर्भागात वेगवेगळ्या फिक्वेन्सीसाठी ठराविक जागा असते. वासाच्या संदर्भात असा नकाशा नसावा असा शास्त्रज्ञांचा समज होता; परंतु गेल्या ६-७ वर्षांतील प्रगत संशोधनामुळे हा समज आता बदलला आहे. हे संशोधन मानवी नाक आणि मेंदू कशा प्रकारे विविध वासांचे विश्लेषण करतो, हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.