Underwater Electricity Generation | समुद्राच्या पोटात वीजनिर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश  
विश्वसंचार

Underwater Electricity Generation | समुद्राच्या पोटात वीजनिर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश

१० मीटर खोल पाण्यात सौरऊर्जा तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनच्या शास्त्रज्ञांनी समुद्राच्या आत सौरऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग यशस्वी केला आहे. युन्नान युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या पथकाने उघड्या समुद्रात १० मीटरच्या खोलीवर ‘पेरोव्स्काईट’ वर आधारित फोटोव्होल्टेईक सिस्टीमची यशस्वी चाचणी घेतली. या संशोधनातून असे दिसून आले आहे की, समुद्रातील निळ्या-हिरव्या आणि कमी प्रकाशाच्या वातावरणातही सौरऊर्जा मिळवणे शक्य आहे.

या प्रणालीने पाण्याखालील बॅटऱ्या चार्ज केल्या आणि एका एलईडी पॅनेलला वीजपुरवठाही केला. या संशोधनाशी संबंधित निष्कर्ष ११ सप्टेंबर रोजी वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झाले आहेत. समुद्राच्या आत सौरऊर्जेचा वापर करण्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे खोलीनुसार सूर्यप्रकाश वेगाने कमी होणे हे आहे. १० मीटरच्या खोलीवर सूर्यप्रकाशाचा केवळ १० टक्के भागच पोहोचू शकतो. लाल रंग असणारा प्रकाश पाण्यात जवळजवळ पूर्णपणे शोषला जातो, तर पारंपरिक सिलिकॉन सोलर सेल्स याच प्रकाशात चांगले काम करतात. याच कारणास्तव शास्त्रज्ञांनी ‘लेड हॅलाईड पेरोव्स्काईट सोलर सेल’चा वापर केला. याचा बँड गॅप सुमारे १.९६ eV इतका आहे, जो पाण्याखाली उपलब्ध असलेल्या निळ्या-हिरव्या प्रकाशाशी तंतोतंत जुळतो.

पेरोव्स्काईट सेल्स कमी प्रकाशात उत्तम कामगिरी करण्यासाठी विकसित केले जाऊ शकतात. मात्र, समुद्राच्या खारट पाण्यात पेरोव्स्काईट अस्थिर ठरू शकते. गंज लागणे, पाण्याचा दाब, पॅकेजिंगच्या समस्या आणि लेडच्या (शीसे) गळतीची शक्यता ही यापुढील मोठी आव्हाने होती. यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘पॉलीहेक्सामेथिलीन ग्वानिडीन हायड्रोक्लोराईड’ (PHMG) चा स्फटिकीकरण घटक (Crystallization Additive) म्हणून वापर केला. यामुळे सोलर सेल समुद्राच्या पाण्यात अधिक स्थिर राहण्यास मदत झाली. युन्नान युनिव्हर्सिटीचे वेन-हुआ झांग यांनी ‘सेल प्रेस’च्या अहवालात म्हटले आहे, ‘पाण्याखाली वापरल्या गेलेल्या यापूर्वीच्या सोलर सेलच्या चाचण्या केवळ २ मीटर किंवा त्याहून कमी खोलीपुरत्या मर्यादित होत्या, ज्या व्यावहारिक वापरापासून खूप दूर होत्या. हे नवीन संशोधन सुमारे १० मीटर खोलीवर पाण्याखाली बुडलेल्या सोलर सेलच्या व्यावहारिक आणि कार्यक्षम वापराचे पहिले थेट प्रमाणीकरण सादर करते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT