प्रथमच ‘हिम भूकंपां’चा शोध Pudhari File Photo
विश्वसंचार

प्रथमच ‘हिम भूकंपां’चा शोध

संशोधकांनी अनेक ‘आईस क्वेक्स’ना रेकॉर्ड करण्यात यश मिळवले

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगात प्रथमच आता ‘हिम भूकंपां’चा छडा लावण्यात आला आहे. संशोधकांनी अनेक ‘आईस क्वेक्स’ना रेकॉर्ड करण्यात यश मिळवले. ग्रीनलँड आईस शीट या नावाने ओळखल्या जाणार्‍या हिमखंडाला हे भूकंप धक्के देत असतात. ग्रीनलँडमधील गोठलेल्या नद्यांचे प्रवाह भूमिगत मार्गाने समुद्रात मिसळण्यासाठी वाहत असताना हे धक्के निर्माण होत असतात.

ग्रीनलँडमधील सर्वात मोठी गोठलेली नदी असलेल्या नॉर्देस्ट ग्रीनलँड आईस स्ट्रीममध्ये 2.7 किलोमीटर खोलीचे छिद्र पाडून एक फायबर-ऑप्टिक केबल आत सोडण्यात आली. या केबलच्या साहाय्याने अशा हिम भूकंपांचा छडा लावला गेला. या नदीच्या मार्गानेच आईसशीटमधून बर्फ उत्तर अटलांटिक महासागरात मिसळला जातो. भूकंपांप्रमाणेच हे हिम भूकंपही सेस्मिक घटना असतात. ज्यावेळी बर्फाचा थर तुटतो किंवा दोन थर एकमेकांना घासले जातात, त्यावेळी या लहरी निर्माण होतात. बर्फाखाली 900 मीटरच्या खोलीवर ज्वालामुखीतून बाहेर आलेल्या कणांचा स्तर असल्याने या लहरी पृष्ठभागापर्यंत पोहोचत नव्हत्या व त्यामुळेच आजपर्यंत त्यांचा छडा लागला नव्हता. ज्वालामुखीय कणांचा हा स्तर 7,700 वर्षांपूर्वी सध्याच्या ओरेगॉनमधील माऊंट माझमा या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बनलेला आहे. स्वित्झर्लंडच्या झुरिचमधील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील जिओफिजिक्सचे प्राध्यापक अँड्रीस फिशनर यांनी सांगितले की, ज्वालामुखीय कणांचा हा स्तर सेस्मिक लहरींना पृष्ठभागापर्यंत पोहोचू देत नाही, शिवाय तोच अशा लहरींच्या उत्पत्तीलाही कारणीभूत होत असतो. बर्फांमधील सल्फेट किंवा अन्य कणांची ही अशुद्धताच आईस क्वेक्स निर्माण करीत असावी. या कणांमुळे बर्फामधील संतुलन बिघडते व छोट्या भेगा निर्माण होऊ लागतात. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT