ब्रुसेल्स : शास्त्रज्ञांनी डीएनएच्या मदतीने तब्बल 10,500 वर्षांपूर्वीच्या एका महिलेचा चेहरा पुन्हा तयार करण्यात यश मिळवले आहे. घेंट विद्यापीठातील संशोधकांनी ही कामगिरी केली असून, बेल्जियममधील म्यूज नदीच्या खोर्यात राहणार्या या प्रागैतिहासिक महिलेची प्रतिमा जगासमोर आणली आहे.
1988 मध्ये दिनांत शहराजवळील मार्गोक्स गुहेत एका मेसोलिथिक (मध्यपाषाणयुगीन) महिलेचे अवशेष सापडले होते. याच अवशेषांवर केलेल्या डीएनए अभ्यासातून संशोधकांना या महिलेच्या शारीरिक रचनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. डीएनए विश्लेषणानुसार, या महिलेचे डोळे निळ्या रंगाचे होते. तिचा त्वचेचा रंग पश्चिम युरोपमधील इतर मेसोलिथिक मानवांच्या तुलनेत काहीसा उजळ होता, तरीही तो आजच्या युरोपियन लोकांपेक्षा गडद होता.
या संशोधनाचे प्रमुख डॉ. मैते रिव्होलॅट यांनी सांगितले की, ‘ही माहिती खूप लहान असली तरी अत्यंत महत्त्वाची आहे.’ शारीरिक आणि पुरातत्त्वीय माहितीच्या आधारावर हा चेहरा पुन्हा तयार करणे शक्य झाले आहे. घेंट विद्यापीठाच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ इसाबेल डी ग्रुटे यांनी सांगितले की, ही महिला ‘चेडर मॅन’ वंशाशी संबंधित होती, जो त्या काळात युनायटेड किंगडममध्ये वास्तव्य करत होता. डी ग्रुटे म्हणाल्या, ‘तिच्या कवटीवरून आम्ही अंदाज लावू शकतो की ती 35 ते 60 वयोगटातील असावी.’
विद्यापीठाचे दुसरे पुरातत्त्वशास्त्रज्ञ फिलिप क्रॉम्बे यांच्या मते, महिलेच्या कवटीतून अत्यंत चांगल्या प्रतीचा डीएनए काढण्यात यश आले, ज्यामुळे चेहरा पुन्हा तयार करणे सोपे झाले. या चेहर्यावरील प्रत्येक तपशील अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. तिचे केस, डोळे आणि त्वचेचा रंग डीएनएवर आधारित आहे. तर तिचे दागिने आणि गोंदण यांसारखी वैशिष्ट्य म्यूज नदीच्या खोर्यात झालेल्या पूर्वीच्या उत्खननातून मिळालेल्या पुरातत्त्वीय माहितीवर आधारित आहेत. या माहितीमुळे संशोधकांना त्या महिलेच्या दैनंदिन जीवनाची कल्पना करण्यासही मदत झाली.