विश्वसंचार

अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर आढळले पाण्याचे अंश

Arun Patil

वॉशिंग्टन : नासाच्या संशोधकांनी अंतराळातील दोन लघुग्रहावर पाण्याचे अंश असल्याचा शोध लावला आहे. यापूर्वी पृथ्वीवर आणलेल्या लघुग्रहावरील नमुन्यात पाण्याचा अंश असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर पाण्याचा अंश आढळण्याची ही पहिलीच घटना आहे. या शोधामुळे ब्रह्मांडाचे अनेक रहस्य उलगडता येऊ शकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. पृथ्वीवर पाणी नेमके कुठून आले, याचाही शोध आता लावता येऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

स्पेस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, हा शोध अंतराळातील स्ट्रटोस्पेयरिक ऑब्झर्व्हटरी फॉर इन्फ्रारेड अ‍ॅस्ट्रॉनॉमी या नासाच्या उडत्या प्रयोगशाळेत लावला गेला आहे. ज्या दोन लघुग्रहावर पाण्याचे अंश आढळून आले, त्यांची नावे आयरिस व मस्सालिया अशी आहेत. सोफियातील टेलिस्कोप व फँट ऑब्जेक्ट इन्फ्रारेड कॅमेर्‍याच्या माध्यमातून चार लघुग्रहावर तेथील पदार्थांचे विश्लेषण करण्यात आले. यातील आयरिस व मस्सालिया या लघुग्रहांवर पाण्याचे अणू आढळून आले.

या दोन्ही लघुग्रहांवर चारही बाजूंनी पाणी कणांच्या रूपात पसरलेले आहे. या लघुग्रहावर सूर्यप्रकाश पडल्यानंतरही पाण्याचा अंदाज येतो. आयरिस लघुग्रह 199 किलोमीटर्स, तर मस्सालिया लघुग्रह 135 किलोमीटर्स रुंद आहे. ते सूर्यापासून 2.39 अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनिट दूर आहेत. पृथ्वीवरील पाणी एखाद्या लघुग्रहावरून आले असेल, असा काही शास्त्रज्ञांचा कयास आहे. मात्र, अद्याप ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.

या शोध पथकाचे प्रमुख अनिसिया अरेडोंडो यांचे असे मत आहे की, लघुग्रह हा एखादा ग्रह निर्माण होत असताना, निर्मिला जात असताना यादरम्यान बरीच संरचना बदलत असते. याच्या पटलावर अनेक ग्रहांवरील अणूंचे मिश्रण आढळू शकते. त्यावर वेगवेगळा प्रकाशझोत टाकून त्याचे तपशील मिळू शकतात आणि त्याद़ृष्टीने यापुढील प्रयत्न असणार आहेत.

SCROLL FOR NEXT