Young star similar to Sun | शास्त्रज्ञांना सापडला सूर्याचा ‘तरुण’ जुळा भाऊ 
विश्वसंचार

Young star similar to Sun | शास्त्रज्ञांना सापडला सूर्याचा ‘तरुण’ जुळा भाऊ

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अंतराळ संशोधनात एक अत्यंत महत्त्वाची आणि विलोभनीय घटना घडली आहे. शास्त्रज्ञांनी अंतराळात एका अशा तार्‍याचा शोध लावला आहे, जो हुबेहूब आपल्या सूर्यासारखा दिसतो. मात्र, हा तारा आपल्या सूर्याच्या तुलनेत अत्यंत तरुण असून, तो स्वतःभोवती वायूचा एक अवाढव्य ‘बुडबुडा’ तयार करत आहे. या तार्‍याचे नाव ‘कऊ 61005’ असून, तो पृथ्वीपासून साधारण 120 प्रकाशवर्षे दूर आहे. याचे वस्तुमान आणि तापमान सूर्यासारखेच असले, तरी याचे वय फक्त 10 कोटी वर्षे आहे. तार्‍यांच्या जगात या वयाला ‘टीनएजर’ किंवा ‘तरुण’ मानले जाते. या शोधामुळे अब्जावधी वर्षांपूर्वी आपला सूर्य बालपणात कसा दिसत असेल, याची झलक शास्त्रज्ञांना पाहायला मिळाली आहे.

‘नासा’च्या ‘चंद्र एक्स-रे ऑब्झर्व्हेटरी’ने या तार्‍याभोवती असलेला ‘एस्ट्रोस्फीअर’ कॅमेर्‍यात कैद केला आहे. हा तप्त वायूचा एक विशाल बुडबुडा असून, तो तार्‍याच्या वेगवान वार्‍यांमुळे तयार झाला आहे. या तार्‍याच्या भोवती धूळ आणि वायूचे पंखांसारखे भाग दिसतात, ज्यामुळे तो एखाद्या उडणार्‍या ‘पतंग’ किड्यासारखा दिसतो. इन्फ्रारेड डेटानुसार, या तार्‍याच्या मागे धुळीचा ढिगारा एखाद्या शेपटीसारखा वाहत असल्याचे दिसते. या तार्‍याभोवती असलेला हा वायूचा बुडबुडा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या तुलनेत सुमारे 200 पटीने मोठा आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ केसी लिसे यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले.

शास्त्रज्ञांच्या मते, या तार्‍यावरून वाहणारे वारे आजच्या सूर्याच्या तुलनेत 3 पट अधिक वेगवान आणि 25 पट अधिक घन आहेत. हे वारे जेव्हा आसपासच्या थंड वायूला धडकतात, तेव्हा हा विशाल बुडबुडा तयार होतो. आपल्या सूर्याभोवतीही असाच एक बुडबुडा आहे, ज्याला ‘हेलिओस्फीअर’ म्हणतात, जो आपल्या सौरमालेचे बाहेरील अंतराळापासून संरक्षण करतो.’ 1990 च्या दशकापासून सूर्यासारख्या तार्‍यांभोवती ‘एस्ट्रोस्फीअर’ शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. हाय-रिझोल्यूशन एक्स-रे इमेजिंगमुळे आज हे शक्य झाले आहे. हे द़ृश्य एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे वाटते. अब्जावधी वर्षांपूर्वी आपला सूर्य किती सक्रिय आणि उग्र असेल, हे समजून घेण्यासाठी ‘कऊ 61005’ चा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या काळी सूर्याच्या अशाच वेगवान वार्‍यांनी आणि धुळीच्या अवशेषांनी आपल्या पृथ्वीसह इतर ग्रहांच्या वातावरणाला आकार दिला असेल. ग्रहांची निर्मिती आणि त्यांच्या वातावरणाचा विकास कसा होतो, याचे रहस्य उलगडण्यास या शोधामुळे मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT