नवी दिल्ली : आपल्या शरीरात असलेल्या सर्व पेशी स्वतःचा कचरा स्वतः साफ करतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, पेशींच्या या सफाई प्रक्रियेवर बाहेरूनही नियंत्रण ठेवता येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटू शकते, पण नुकत्याच भारतात झालेल्या एका संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे.
संशोधकांना असे आढळून आले आहे की, शरीरातील पेशी जेव्हा स्वतःहून कचरा साफ करण्याची प्रक्रिया सुरू करतात, तेव्हा ती बाहेरूनही नियंत्रित केली जाऊ शकते. या शोधामुळे कर्करोग किंवा पार्किन्सन्स यांसारख्या आजारांमध्ये पेशींच्या सफाई प्रक्रियेचे कार्य समजून घेण्यास मोठी मदत मिळू शकते; कारण या आजारांमध्ये ही नैसर्गिक प्रक्रिया व्यवस्थित काम करत नाही. हे संशोधन नवी दिल्ली येथील ‘काैन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ (CSIR)- ‘इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी’ (IGIB), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी, सोनीपत येथील अशोका युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉॉस एंजिलीस’च्या संशोधकांनी संयुक्तपणे केले आहे. ‘ऑटोफॅगी’ ही शरीराची एक रिसायकलिंग प्रक्रिया आहे.
यामध्ये पेशी ‘ऑटोफॅगोसोम’ नावाचा रिसायकलिंग बिनसारखा भाग तयार करून निरुपयोगी घटक काढून टाकण्याचे काम करतात. या रिसायकलिंग बिनमध्ये एक थर तयार होतो जो आधी पेशींमधील कचऱ्याला सर्व बाजूंनी घेरतो. त्यानंतर पेशी त्या कचऱ्याचे विघटन करते आणि त्या घटकांचा वापर ऊर्जेसाठी किंवा नवीन वाढीसाठी करते. ऑटोफॅगी प्रक्रिया सक्रिय करणाऱ्या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ (ठरावीक वेळेच्या अंतराने उपवास करणे). यात दीर्घकाळ उपाशी राहिल्यानंतर शरीरातील ग्लुकोज आणि अमिनो ॲसिडची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा वाचवण्याचे संकेत मिळतात. ग्रीक भाषेत ‘ऑटोफॅगी’चा अर्थ ‘स्वतःला खाणे’ असा होतो. संशोधकांनी संशोधनादरम्यान सिम्युलेशनच्या माध्यमातून ऑटोफॅगी प्रक्रियेत सहभागी असलेल्या ‘LC3’ नावाच्या प्रथिनाचे (Protein) वर्तन पाहिले. यात असे दिसून आले की, पेशींच्या रिसायकलिंग बिनच्या आतील पृष्ठभागाला स्पर्श करताच हे प्रथिन आपला आकार बदलते.