वैज्ञानिकांना सापडला जीवसृष्टी असलेला ग्रह? 
विश्वसंचार

वैज्ञानिकांना सापडला जीवसृष्टी असलेला ग्रह?

scientists discover planet : संशोधनातून 99.7 टक्के खात्री; सूक्ष्म जीवांमुळेच निर्माण होणार्‍या दोन अणूंचे अस्तित्व

पुढारी वृत्तसेवा

लंडन ः एलियन अर्थात परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत असलेल्या वैज्ञानिकांना मोठे यश लाभले आहे. ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अंतराळातील ‘के2-18 बी’ या सुदूर ग्रहावर जीवसृष्टीसंदर्भातील महत्त्वाचे संकेत मिळवल्याचा दावा केला आहे. हे संकेत इतके ठोस आहेत की, वैज्ञानिक 99.7 टक्के खात्रीने सांगत आहेत, या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे.

‘द सन’ या ब्रिटिश माध्यम संस्थेनुसार, ‘के2-18 बी’ हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल 120 प्रकाशवर्षे दूर आहे आणि तो आपल्या पृथ्वीपेक्षा सुमारे 2.5 पट मोठा आहे. विशेष म्हणजे, वैज्ञानिकांनी या ग्रहाच्या वातावरणात डायमेथिल सल्फाईड (DMS) या अणूचा शोध लावला आहे, जो पृथ्वीवर केवळ सागरी शैवालांद्वारे तयार होतो. हे शैवाल मानवी डोळ्यांना दिसत नाहीत; पण समुद्राच्या पृष्ठभागावर रंगीत डागांसारखे आढळतात. ‘के2-18 बी’च्या वातावरणात (DMS) सोबतच डायमेथिल डायसल्फाईड (ADS) या दुसर्‍या अणूचाही शोध लागला आहे. हे दोन्ही अणू पृथ्वीवर सूक्ष्मजीवांमुळेच तयार होतात. त्यामुळे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, यांचं अस्तित्व हे केवळ जैविक प्रक्रियांमुळेच शक्य आहे, म्हणजेच सजीवांशिवाय हे अणू निर्माण होणे अशक्य आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या अत्याधुनिक अवकाश दुर्बिणीतून मिळालेल्या डेटाचा वापर केला. या दुर्बिणीला 2021 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते आणि ती आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली टेलिस्कोप मानला जातो. प्रोफेसर निक्कू मधुसूदन यांनी सांगितले की, ‘के 2-18 बी’ हा एक हायसीन ग्रह असू शकतो. ‘हायसीन’ हा शब्द हायड्रोजन आणि ओशन (महासागर) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. अशा ग्रहांवर घन हायड्रोजनयुक्त वातावरण आणि पाण्याने भरलेले महासागर असू शकतात. त्यांनी पुढे सांगितले की, ‘आपल्याला तिथल्या तापमानाची अचूक माहिती नाही; पण तो पृथ्वीपेक्षा थोडा अधिक उष्ण असण्याची शक्यता आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT