शास्त्रज्ञांना सापडला असा ग्रह, जो गमावत आहे स्वतःचे अस्तित्व Pudhari File Photo
विश्वसंचार

शास्त्रज्ञांना सापडला असा ग्रह, जो गमावत आहे स्वतःचे अस्तित्व

तारा प्रदक्षिणा घालत असताना, अक्षरशः त्याचे तुकडे होत आहेत

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी असा एक ग्रह शोधला आहे, जो स्वतः नष्ट होत आहे. आपला तारा प्रदक्षिणा घालत असताना, अक्षरशः त्याचे तुकडे होत आहेत. पृथ्वीपासून सुमारे 140 प्रकाशवर्षे दूर, पेगासस तारकासमूहात स्थित असलेला हा ग्रह BD+05 4868 Ab अशा नावाचा आहे. हा ग्रह आपल्या तार्‍याभोवती अवघ्या 30.5 तासांत एक फेरी पूर्ण करतो. तो त्याच्या तार्‍याच्या इतक्या जवळ आहे की, त्याचा पृष्ठभाग जळून माती आणि वायूत रूपांतरित होत आहे.

प्रत्येक प्रदक्षिणेसोबत BD+05 4868 Ab आपल्या मागे लाव्हा सारखी जळती झालर सोडतो, जणू काही लाव्हाच्या पुंजक्याचा धूमकेतूच. हे द़ृश्य एका ग्रहाच्या अंतिम विनाश प्रक्रियेचे दुर्मीळ दर्शन घडवत आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रत्येक जळत्या 30-तासांच्या प्रदक्षिणेदरम्यान ग्रह जवळजवळ 3,000 अंश फॅरनहाईट (सुमारे 1,600 अंश सेल्सिअस) तापतो आणि एका माऊंट एव्हरेस्टच्या वजनाइतका वितळलेल्या खडकांचा गाळ सोडतो.

‘या ग्रहाची शेपटी अफाट आहे, सुमारे 9 दशलक्ष किलोमीटर लांब, म्हणजेच ग्रहाच्या कक्षेच्या जवळजवळ निम्म्या अंतराएवढी,’ असे MIT च्या कावली इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अँड स्पेस रिसर्चमधील पोस्टडॉक्टरल संशोधक मार्क ऑन यांनी एका निवेदनात सांगितले. हे एक थेट घडणारे महाकाय विघटन आहे आणि संपूर्ण ग्रह नष्ट होण्यासाठी 10 ते 20 लाख वर्षे लागतील, असा अंदाज या संशोधकांनी वर्तवला आहे. ‘आम्ही अगदी योग्य वेळी हे पकडले, जेव्हा ग्रह अक्षरशः शेवटच्या श्वासांवर आहे,’ असे TESS Science Office मधील सहसंशोधक अवी श्पोरर यांनी सांगितले.

आतापर्यंत सापडलेल्या 6,000 हून अधिक बाह्यग्रहांपैकी केवळ तीनच असे आहेत, जे अशाप्रकारे नष्ट होताना आढळले आहेत, प्रत्येकाच्या मागे धूमकेतूसारखी धूळ आणि गाळाची शेपटी आहे. मात्र, BD+05 4868 Ab या ग्रहाची शेपटी सर्वात मोठी आहे. ‘याचा अर्थ असा होतो की, या ग्रहाचे बाष्पीकरण अत्यंत विनाशकारी आहे आणि तो इतर ग्रहांपेक्षा अधिक वेगाने नष्ट होईल,’ असे ऑन यांनी स्पष्ट केले. BD+05 4868 Ab त्याच्या ताराच्या अत्यंत जवळ असल्याने, जेव्हा तो तार्‍याच्या समोरून जातो, तेव्हा तार्‍याच्या प्रकाशात निर्माण होणारी घट अतिशय स्पष्टपणे दिसते. नासाच्या Transiting Exoplanet Survey Satellite (TESS) वेधशाळेने या ग्रहाचा शोध लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT