लंडन : काळाची (Time) सुरुवात कशी झाली? विश्वाच्या बाहेर जर काहीच अस्तित्वात नाही, तर मग काळाची संकल्पना कुठून आली? या विज्ञानातील सर्वात गुंतागुंतीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात एका भौतिकशास्त्रज्ञाला मोठे यश आले आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत एक ‘मिनी-युनिव्हर्स’ (लहान विश्व) तयार करून, एका वेगळ्या (Isolated) क्वांटम सिस्टीममधून ‘काळ’ कसा उगम पावतो, याचा प्रायोगिक अनुभव घेतला आहे.
'फिजिकल रिव्ह्यू रिसर्च' या प्रसिद्ध जर्नलमध्ये ११ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात या आश्चर्यकारक प्रयोगाची माहिती देण्यात आली आहे. युनायटेड किंगडममधील बर्मिंगहॅम विद्यापीठातील प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ जियोव्हानी बारोंतिनी यांनी हा अद्भुत प्रयोग केला आहे. प्राध्यापक बारोंतिनी यांनी हे लहान विश्व तयार करण्यासाठी अत्यंत थंड असलेल्या अणूंच्या ढगाचा वापर केला. ही क्वांटम प्रणाली तिच्या सभोवतालच्या वातावरणापासून इतकी वेगळी ठेवण्यात आली होती की, आपल्या अथांग विश्वाप्रमाणेच या प्रणालीबाहेरही वेळ मोजण्यासाठी कोणतेही साधन किंवा घड्याळ उपलब्ध नव्हते.
यानंतर त्यांनी या प्रणालीचे दोन भाग केले आणि एका भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, ज्याला त्यांनी 'डार्क सेक्टर' असे नाव दिले. या प्रयोगातून त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की, वेळेची निर्मिती पूर्णपणे त्या प्रणालीच्या आतूनच होऊ शकते, त्यासाठी बाहेरील कोणत्याही घटकाची गरज नसते. ‘‘जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी एकत्र आणता, तेव्हा खरोखरच अर्थबोध होऊ लागतो,’’ असे बारोंतिनी यांनी सांगितले. ‘‘सिस्टीमच्या आत वेळ कशी वेगवान होत होती, संथ होत होती किंवा चक्क थांबत होती, हे सर्व पाहणे अत्यंत आश्चर्यकारक होते. सर्व गोष्टी अगदी अचूकपणे जुळून आल्या, जे प्रयोगांमध्ये सहसा घडत नाही.’’ हा प्रयोग ‘काळ हा एक भास आहे’ असा कोणताही धक्कादायक दावा करत नाही; तर क्वांटम कॉस्मॉलॉजी आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये दशकानुदशके मांडल्या जाणाऱ्या सिद्धांतांची प्रयोगशाळेत केलेली ही पहिली थेट आणि परिमाणवाचक चाचणी आहे.