स्टॅनफोर्ड : वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या लसी टोचून घेण्याचे दिवस लवकरच संपू शकतात. शास्त्रज्ञांनी एका अशा प्रायोगिक लसीचा शोध लावला आहे, जी केवळ एका विषाणूवर नाही, तर अनेक प्रकारचे जीवाणू, श्वसनाचे विषाणू आणि ॲलर्जीपासूनही संरक्षण देऊ शकते. उंदरांवर करण्यात आलेल्या या संशोधनाचे सकारात्मक परिणाम समोर आले असून, याला ‘युनिव्हर्सल’ (सार्वत्रिक) लस म्हणून पाहिले जात आहे.
दुहेरी संरक्षण : ही लस शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला आणि विशिष्ट विषाणूंना लक्षात ठेवणाऱ्या प्रणालीला एकाच वेळी सक्रिय करते. प्रयोगातील यश : उंदरांना तीन आठवड्यांच्या कालावधीत या लसीचे तीन डोस देण्यात आले. त्यानंतर पुढील तीन महिने त्यांच्यामध्ये खालील घटकांविरुद्ध प्रतिकारशक्ती दिसून आली : कोविड-19 (डअठड- उेत-2) आणि इतर कोरोना व्हायरस, स्टॅफिलोकोकस ऑरिअस आणि ॲसिनिटोबॅक्टर बामुनी हे घातक जीवाणू, घरातील धुळीच्या कणांमुळे होणारी ॲलर्जी. दीर्घकाळ सक्रियता : फुफ्फुसातील रोगप्रतिकारक पेशींना काही दिवसांऐवजी अनेक महिने सक्रिय ठेवण्यासाठी ही लस विशेष सिग्नल पाठवते.
लसीचे नाव आणि कार्यपद्धती
या नवीन नेझल स्प्रे लसीला 'GLA-3 M-052- LS+OVA' असे नाव देण्यात आले आहे. ही लस क्षयरोगाच्या (TB) "BCG' लसीच्या तत्त्वावर आधारित आहे. यामध्ये अंड्यातील एका निरुपद्रवी प्रथिनाचा (Egg-protein antigen) वापर करण्यात आला आहे, जो फुफ्फुसांमध्ये योग्य रोगप्रतिकारक पेशी जमा करण्यास मदत करतो. सध्या हे प्रयोग केवळ प्रयोगशाळेतील प्राण्यांवर करण्यात आले आहेत. ही लस मानवासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी अजून अनेक मानवी चाचण्या पार पाडणे आवश्यक आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास भविष्यात एकाच लसीद्वारे अनेक आजारांचा सामना करणे शक्य होईल.
ही लस वेगळी कशी आहे?
सामान्यतः लसी शरीरातील ‘ॲडॉप्टिव्ह’ रोगप्रतिकारक शक्तीला विशिष्ट विषाणू ओळखण्याचे प्रशिक्षण देतात. मात्र, 19 फेबुवारी रोजी ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, ही नवीन ‘नाकाद्वारे दिली जाणारी लस’ (Nasal Spray) वेगळ्या पद्धतीने काम करते. ही लस केवळ विशिष्ट विषाणूला लक्ष्य न करता शरीराची ‘इननेट’ ((Innate) रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते. ही शक्ती शरीराची पहिली संरक्षण भिंत असते, जी कोणत्याही परकीय आक्रमकाविरुद्ध लढण्यास तयार असते. ‘इननेट सिस्टमचे वैशिष्ट्य म्हणजे ती सूक्ष्मजीवांच्या मोठ्या श्रेणीपासून संरक्षण देऊ शकते,’ असे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील सूक्ष्मजीवशास्त्र आणि रोगप्रतिकारशास्त्राचे प्राध्यापक बाली पुलेंद्रन यांनी सांगितले.