वॉशिंग्टन : वाढत्या तापमानामुळे आजकाल इमारती थंड ठेवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. यामुळेच जगभरात एअर कंडिशनरची मागणी झपाट्याने वाढत आहे. एसी घरे तर थंड ठेवतो; पण यामुळे विजेचा वापर प्रचंड वाढतो; ज्याचा परिणाम म्हणजे पैशांचा अपव्यय आणि ग्रीनहाऊस वायूंचे वाढते उत्सर्जन! परंतु, आता शास्त्रज्ञांनी एका अशा रंगाचा (पेंट) शोध लावला आहे, जो एसीशिवाय इमारतींना गरम होण्यापासून रोखेल आणि त्यांना नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्यास मदत करेल.
‘पर्ड्यू युनिव्हर्सिटी’च्या अभियंत्यांच्या एका टीमने या क्षेत्रात मोठा शोध लावला आहे. संशोधकांनी आतापर्यंतचा सर्वात पांढरा रंग तयार केला आहे, जो थेट कडक उन्हातही सूर्यप्रकाश परावर्तित करून पृष्ठभाग नैसर्गिकरीत्या थंड ठेवतो. पांढरा रंग उष्णता सर्वात कमी शोषून घेतो. त्यामुळेच अभियंत्यांनी हे नवीन कोटिंग तयार केले आहे, जेणेकरून सूर्यापासून येणारी जवळजवळ सर्व उष्णता छतावर किंवा भिंतींवर शोषली न जाता परत पाठवली जाईल. लॅबमधील चाचण्यांदरम्यान संशोधकांनी सांगितले की, हा पेंट सूर्यप्रकाशाचा सुमारे ९८.१ टक्के भाग रिफ्लेक्ट करतो. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही पांढऱ्या पेंटपेक्षा किंवा आधीच्या प्रयोगांपेक्षा ही कामगिरी अत्यंत उत्तम आहे.
‘ACS ॲप्लाईड मटेरियल्स अँड इंटरफेसेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात, टीमने या पेंटला आतापर्यंतचे सर्वात प्रभावी ‘रेडिएटिव्ह कूलिंग कोटिंग’ म्हटले आहे. संशोधन टीमने अनेक प्रकारच्या नैसर्गिक पांढऱ्या पदार्थांची तुलना केल्यानंतर मुख्य घटक म्हणून ‘बेरियम सल्फेट’ची निवड केली. हा घटक त्याच्या चमकदार पांढऱ्या रंगामुळे सौंदर्यप्रसाधने आणि फोटोग्राफिक कागदांमध्ये आधीपासूनच वापरला जातो. संशोधकांसाठी पेंटमधील कणांचा आकारही खूप महत्त्वाचा होता. एकाच आकाराच्या कणांऐवजी त्यांनी विविध आकारांचे कण एकत्र केले. प्रत्येक कण सूर्यप्रकाशाच्या वेगवेगळ्या वेव्हलेंथशी प्रतिक्रिया देतो. त्यामुळे वेगवेगळ्या आकारांचे कण मिसळल्याने सौर स्पेक्ट्रमचा जास्तीत जास्त भाग शोषला न जाता थेट वातावरणात रिफ्लेक्ट होतो.
नेहमीच्या पेंटपेक्षा कितीतरी पट प्रभावी!
साधारण पांढरे पेंट सूर्याची इतकी उष्णता शोषून घेतात की, त्यामुळे इमारती गरम होतातच. अगदी विशेष ‘कूल रूफ’ उत्पादनेसुद्धा सूर्यप्रकाशाचा केवळ ८० ते ९० टक्के भागच मागे पाठवू शकतात, ज्यामुळे उर्वरित उष्णतेने पृष्ठभाग गरम होतो. मात्र, या नव्या पेंटच्या प्रत्यक्ष चाचणीत असे दिसून आले की, हा पेंट पृष्ठभागाचे तापमान सामान्य सावली किंवा पारंपरिक कोटिंगपेक्षा कितीतरी पट कमी करू शकतो. भर दुपारी कडक उन्हात चाचणी केली असता, हा पेंट दिलेल्या पृष्ठभागाचे तापमान आसपासच्या हवेच्या तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअसने कमी नोंदवले गेले. सूर्य मावळल्यानंतर या पृष्ठभागाचे तापमान आसपासच्या हवेपेक्षा तब्बल १०.५ अंश सेल्सिअसने कमी झाले. विशेष म्हणजे, हिवाळ्यातही या पेंटचा असाच परिणाम दिसून आला आहे.