Bat Immunity | वटवाघळांमधील विषाणूंबाबतच्या प्रतिकारशक्तीचे गूढ उलगडले 
विश्वसंचार

Bat Immunity | वटवाघळांमधील विषाणूंबाबतच्या प्रतिकारशक्तीचे गूढ उलगडले

विशेष ‘अँटीबॉडी’ यंत्रणेचा शोध

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : रेबीज, सार्स, इबोला आणि कोरोना यांसारखे अनेक जीवघेणे विषाणू शरीरात असूनही वटवाघळे स्वतः आजारी न पडता सहज कशी जगू शकतात, या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. वटवाघळांच्या शरीरातील एका अद्वितीय अँटीबॉडी यंत्रणेमुळे त्यांना विषाणूंचा कोणताही त्रास होत नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे.

सामान्यतः कोणताही विषाणू शरीरात शिरल्यास मानवासह इतर प्राण्यांच्या शरीरात तीव्र दाह/सूज निर्माण होते, ज्यामुळे अवयव निकामी होतात. मात्र, वटवाघळांची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत संतुलित पद्धतीने काम करते. शास्त्रज्ञांच्या मते, वटवाघळांमध्ये आढळणाऱ्या अँटीबॉडीज इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने विषाणूंना रोखतात. या अँटीबॉडीज विषाणूचा संसर्ग रोखण्यासोबतच शरीरात धोकादायक ‘हायपर इन्फ्लेमेटरी’ (अति-दाहक) प्रतिक्रिया निर्माण होऊ देत नाहीत. ही अनोखी यंत्रणा वटवाघळांना विषाणू पूर्णपणे नष्ट न करताही त्यांच्यासोबत शरीरात सुरक्षितपणे राहण्याची क्षमता देते.

यामुळेच वटवाघळे स्वतः आजारी पडत नाहीत; पण विषाणूंचे वाहक ठरतात. वटवाघळांच्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकारशक्तीचा अभ्यास करून मानवासाठी नवीन औषधे आणि अँटीव्हायरल थेरपी विकसित करणे शक्य होणार आहे. तसेच भविष्यात येणाऱ्या संभाव्य साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मानवी शरीरातील घातक ‘इन्फ्लेमेशन’ कमी करण्यासाठी हा शोध अत्यंत मोलाचा ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT