ग्रीनलँड शार्कच्या संपूर्ण जीनोमचे पहिल्यांदाच डिकोडिंग 
विश्वसंचार

Greenland Shark : ग्रीनलँड शार्कच्या संपूर्ण जीनोमचे पहिल्यांदाच डिकोडिंग

कर्करोगमुक्ती आणि दीर्घायुष्याचे रहस्य उलगडले!

पुढारी वृत्तसेवा

टोकियो ः पृथ्वीवरील सर्वात जास्त जगणारा पाठीचा कणा असलेला प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‌‘ग््राीनलँड शार्क‌’च्या संपूर्ण जीनोमचा जगातील पहिला नकाशा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या जनुकीय संशोधनामुळे हे शार्क शेकडो वर्षे कसे जगतात आणि त्यांना कर्करोग का होत नाही, याचे अनेक अनुवांशिक धागेदोरे हाती लागले आहेत. या शोधामुळे भविष्यात मानवामधील वाढत्या वयाशी संबंधित आजारांवर अधिक प्रभावी उपचार शोधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

ग््राीनलँड शार्क (शास्त्रीय नाव : Somniosus microcephalus) प्रामुख्याने उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागराच्या अत्यंत थंड पाण्यात सुमारे 1.65 मैल (2.65 किलोमीटर) खोलीवर राहतात. अथांग खोलीवर राहत असल्यामुळे या जीवांबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांना फारशी माहिती उपलब्ध नव्हती. साधारण 13 ते 16 फूट लांबी असणाऱ्या या शार्कचे आयुष्य तब्बल 400 वर्षांचे असते, तर वयाच्या 150 व्या वर्षांपर्यंत ते पूर्णपणे प्रौढदेखील होत नाहीत. टोकियो विद्यापीठातील मत्स्य व्यवसाय रसायनशास्त्रज्ञ शिगेहारू किनोशिता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शार्कच्या जीनोमचा तब्बल 96.7 टक्के भाग उलगडला आहे. 19 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या ‌‘पीएनएएस‌’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक मासिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, या शार्कच्या जीनोममध्ये दीर्घायुष्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण जीन्स आढळले आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख शोध म्हणजे ‌‘लिंकर हिस्टोन प्रोटीन्स‌’ (Linker histone proteins) - जे डीएनएला गुंडाळण्याचे व संकुचित करण्याचे काम करतात) मधील अमिनो ॲसिडची अनोखी रचना होय. ही रचना शार्कच्या क्रोमॅटिनची रचना स्थिर ठेवण्यास मदत करते. यामुळेच एवढ्या प्रदीर्घ आयुष्यातही त्यांच्या डीएनएचे नुकसान होत नाही, अशी माहिती किनोशिता यांनी दिली.

या संशोधनात शार्कच्या शरीराबद्दल आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत: प्रभावी रोगप्रतिकारक शक्ती आणि डीएनए दुरुस्ती : शार्कच्या जीनोममध्ये रोगप्रतिकारक क्षमता आणि डीएनए दुरुस्ती करणाऱ्या जीन्सची संख्या लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळले. यामुळे शरीरातील खराब पेशींची दुरुस्ती अत्यंत वेगाने होते, ज्यामुळे त्यांना कर्करोग होत नाही. लोह नियंत्रण आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून बचाव : संशोधनात ‌‘फेरीटीन‌’ जीन्सची मोठी साखळी आढळून आली, जी शरीरातील लोह नियंत्रित करण्याचे काम करते. यामुळे त्यांच्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मर्यादित राहतो आणि लोहाच्या अतिरेकामुळे पेशी नष्ट होण्याच्या प्रक्रियेला अटकाव होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT