कॅनबेरा : भौतिकशास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या इतिहासात प्रथमच अणूंच्या प्रत्यक्ष हालचालीमध्ये ’क्वांटम एंटँगलमेंट’ पाहण्याचा विक्रम केला आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी ज्याला एकेकाळी ‘स्पूकी अॅक्शन एट अ डिस्टन्स‘ (दूर अंतरावरून घडणारी अनाकलनीय कृती) असे संबोधले होते, ते आता अधिक स्पष्टपणे वास्तव म्हणून समोर आले आहे.
‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, संशोधकांनी सिद्ध केले की ‘अल्ट्राकोल्ड हेलिअम’ अणूंच्या जोड्या त्यांच्या ‘मोमेंटम’ (संवेग - वस्तूचा वेग आणि दिशा) द्वारे एकमेकांशी क्वांटम पद्धतीने जोडल्या जाऊ शकतात. क्वांटम एंटँगलमेंट हे क्वांटम मेकॅनिक्समधील सर्वात विचित्र वैशिष्ट्यांपैकी एक आहे. जेव्हा दोन कण एकमेकांत गुंफलेले असतात, तेव्हा एका कणामध्ये होणारा बदल दुसर्या कणावर त्वरित परिणाम करतो, मग ते एकमेकांपासून कितीही दूर का नसोत.
यापूर्वी वैज्ञानिकांनी प्रकाशाच्या कणांमध्ये (फोटॉन्स) हे सिद्ध केले होते; परंतु वस्तूमान असलेल्या कणांच्या ‘हालचाली’मध्ये असे कधीही घडले नव्हते. अणूंना वस्तूमान असते आणि वस्तूमानावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो, जो फोटॉन्सवर होत नाही. त्यामुळे भविष्यात या तंत्राचा वापर करून पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा नकाशा तयार करणे किंवा अंतराळातील गुरुत्वीय लहरी शोधणे शक्य होईल. ऑस्ट्रेलियातील नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे वरिष्ठ लेखक शॉन हॉजमन यांनी या प्रक्रियेची माहिती दिली : बोस-आईन्स्टाईन कंडेन्सेट : संशोधकांनी हेलिअम अणूंना ‘अॅब्सोल्यूट झिरो’ तापमानापर्यंत थंड केले. यामुळे अणूंची स्वतंत्र ओळख पुसली जाऊन ते एका समूहाप्रमाणे (Bose- Einstein Condensate) वागू लागले.
लेझरचा वापर : लेझर पल्सच्या साहाय्याने या समूहाचे तीन भाग करण्यात आले. जेव्हा हे अणू एकमेकांवर आदळले, तेव्हा ते विरुद्ध दिशांना विखुरले गेले आणि त्यातून ‘स्कॅटरिंग हॅलोस’ तयार झाले. एंटँगलमेंटची स्थिती : अत्यंत कमी घनतेमुळे एका प्रयोगात केवळ अणूंची एकच जोडी विखुरली गेली. ही जोडी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या स्थितींमध्ये (Superposition) अस्तित्वात होती, जे क्वांटम एंटँगलमेंटचे लक्षण आहे. हे एंटँगलमेंट खरे आहे, हे सिद्ध करण्यासाठी टीमने ‘रॅरिटी-टॅपस्टर इंटरफेरोमीटर’ (Rarity- Tapster interferometer) नावाच्या उपकरणाचा वापर केला. 1990 मध्ये प्रथम फोटॉन्ससाठी वापरले गेलेले हे तंत्र आता प्रथमच जड पदार्थांच्या लाटांसाठी (Matter waves) यशस्वीपणे वापरण्यात आले आहे.