विश्वसंचार

पाण्याखाली 93 दिवस राहून परतला वैज्ञानिक

Arun Patil

न्यूयॉर्क : समुद्राच्या पाण्याखाली तब्बल 93 दिवस राहून एक माणूस आता पुन्हा एकदा जमिनीवर परत आला आहे. एका वैज्ञानिक प्रयोगासाठी हा माणूस पाण्याखाली राहण्यासाठी गेला होता व या मुदतीत त्याने एक विश्वविक्रमही घडवला. या माणसाचे नाव आहे जोसेफ डिटूरी. अमेरिकेच्या नौदलातील या निवृत्त अधिकार्‍याला 'मिस्टर डीप सी' असेही म्हटले जाते. अटलांटिक महासागरात 93 दिवस राहून ते आता परत आले आहेत.

डिटूरी हे एक वैज्ञानिकही आहेत. मी माझ्या वयाला दहा वर्षांनी घटवले असल्याचा त्यांचा दावा आहे. अटलांटिक महासागरात 100 चौरस फुटांच्या एका पॉडमध्ये ते राहत होते. बाहेर आल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि ते ठणठणीत असल्याचे दिसून आले. पाण्याखाली 73 दिवस राहण्याचा यापूर्वीचा एक विश्वविक्रम होता. तो डिटूरी यांनी सहज मोडला. पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचे त्यांनी ठरवले होते; पण आता 93 दिवस राहिल्यानंतर ते बाहेर आले आहेत. समुद्रात राहण्यापूर्वी त्यांनी मानवी शरीरावर दबाव बनवणार्‍या वातावरणाच्या प्रभावावर संशोधन केले होते.

डिटूरी आता मार्च 2024 मध्ये पुन्हा एकदा पाण्याखाली राहण्यास जाणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की पाण्याखाली राहिल्यानंतर त्यांची उंची वाढली आहे, तसेच प्रयोगाच्या प्रारंभाच्या तुलनेत त्यांच्या शरीरातील स्टेम सेल्स म्हणजेच मूळपेशी दहा पटीने वाढल्या आहेत. आपल्याला आता 66 टक्के अधिक गाढ झोप येते असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे कोलेस्टेरॉल 77 अंकांनी कमी झाले तसेच अन्य समस्याही निम्म्या कमी झाल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT