Ancient Surgery 
विश्वसंचार

Ancient Surgery : चीनमध्ये सापडली 600 वर्षे जुनी शस्त्रक्रियेची साधने

जगातील पहिल्या ‌‘टोपिकल ॲनेस्थेशिया‌’चे पुरावे उजेडात

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनमधील एका प्राचीन कबरीत सापडलेल्या 600 वर्षे जुन्या शस्त्रक्रियेच्या साधनांवरून जगातील पहिल्या ‌‘टोपिकल ॲनेस्थेशिया‌’चे (त्वचा बधिर करणारे औषध) रासायनिक पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत.

शस्त्रक्रियेदरम्यान त्वचा बधिर करण्यासाठी हे औषध वापरले जात होते. विशेष म्हणजे, हे गुंगीचे औषध ‌‘चायनीज वोल्फ्सबेन‌’ नावाच्या अत्यंत विषारी वनस्पतीपासून तयार केले गेले होते. मात्र, वापरण्यापूर्वी मानवी मूत्र आणि इतर घटकांच्या साहाय्याने या वनस्पतीतील विषारीपणा नष्ट केला गेला असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे.

‌‘सहा शतकांपूर्वी मिंग राजवंशातील एका शल्यचिकित्सकाने (सर्जन) लोखंडी कात्री आणि चिमट्याच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली होती. आज आम्ही लेझर प्रकाशाच्या साहाय्याने त्याच साधनांवर शिल्लक राहिलेल्या गुंगीच्या औषधाचे अंश शोधून काढले आहेत,‌’ अशी माहिती या संशोधनाचे सह-लेखक आणि चीनच्या नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कॉंगकॅंग झाओ यांनी दिली. ‌‘अँटिक्विटी‌’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात या शोधप्रबंधाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. झाओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शांघायपासून साधारण 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिआंगयिन शहरात ‌‘शिया क्वान‌’ या मिंग राजवंश (काळ : 1368 ते 1644) काळातील व्यक्तीच्या कबरीतून मिळालेल्या दोन साधनांचा अभ्यास केला.

संशोधकांनी ‌‘एक्स-रे फ्लूरोसेन्स विश्लेषण‌’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी केली असता, ही कात्री आणि चिमटा लोखंडाचे बनलेले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली पाहत त्यांनी साधनांवर जमा झालेल्या तांबूस रंगाच्या गंजाचे तीन लहान कण गोळा केले. या कणांचे रासायनिक घटक शोधण्यासाठी ‌‘मायक्रो-रामन स्पेक्ट्रोस्कोपी‌’ या तंत्राचा वापर करण्यात आला. यात नमुन्यावर लेझरचा मारा केला जातो, ज्यामुळे रेणूंची रचना समजून घेणे सोपे जाते. या विश्लेषणामध्ये हायड्रोजन सायनाईडमध्ये आढळणारा ‌‘सायनो फंक्शनल ग््रुाप‌’ तसेच तेल आणि चरबीचे सेंद्रिय घटक आढळून आले. या सर्व घटकांवरून हे स्पष्ट होते की, ही औषधी वनस्पती वेदनाशामक म्हणून वापरली गेली होती. या अवशेषांमध्ये ‌‘ॲकोनिटिन‌’ नावाचे विषारी अल्कलॉइड असण्याची दाट शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

‌‘ॲकोनिटिन‌’ हे उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये आढळणाऱ्या ‌‘ॲकोनिटम‌’ प्रजातीच्या वनस्पतींमध्ये आढळते. अत्यंत विषारी असलेल्या या वनस्पतींचा वापर आशियाई पारंपरिक औषधांमध्ये शतकानुशतके वेदनाशामक म्हणून केला जात आहे. मिंग राजवंशातील वैद्यांना या वनस्पतीचे विष कसे कमी करायचे, याचे उत्तम ज्ञान होते. संशोधकांच्या मते, या वनस्पतीतील विष नष्ट करण्यासाठी आणि त्याचे रूपांतर गुंगीच्या पावडर किंवा द्रवात करण्यासाठी ते मूग, व्हिनेगर किंवा लहान मुलांच्या मूत्रासारख्या आम्लयुक्त पदार्थांचा वापर करत असत. या प्रक्रियेमुळे वनस्पती विषारी न राहता एक उत्तम भूल देणारे औषध बनायची.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT