Plasma Technology Vanessa Jewell
विश्वसंचार

Plasma Technology : पाणी न वापरता कपडे स्वच्छ करणारे अनोखे ‌‘प्लाझ्मा तंत्रज्ञान‌’

शास्त्रज्ञांच्या नव्या प्रयोगाला मोठे यश

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : भविष्यात चंद्र आणि मंगळ ग््राहावर जाणाऱ्या मानवाच्या दीर्घकालीन मोहिमांची तयारी वेगाने सुरू आहे. पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांसमोर अनेक तांत्रिक आव्हाने आहेत. अंतराळवीरांना सुरक्षित ठेवण्यासाठी उत्तुंग रॉकेटस्‌‍ आणि अत्याधुनिक घरे विकसित करणे जितके गरजेचे आहे, तितकेच तिथे ‌‘कपडे कसे धुवायचे?‌’ या समस्येचा तोडगा काढणेही आवश्यक आहे. आता या समस्येवर शास्त्रज्ञांनी एक अनोखा मार्ग शोधला आहे. ‌‘सुपरचार्ज्ड प्लाझ्मा‌’च्या नियंत्रित प्रवाहाचा वापर करून, पाणी न वापरता अंतराळातील कपडे स्वच्छ करण्याच्या एका नव्या प्रयोगशाळेतील प्रयोगाला मोठे यश आले आहे.

पृथ्वीप्रमाणे अंतराळातही कपडे धुणे कंटाळवाणे वाटू शकते; परंतु अंतराळवीरांचे आरोग्य आणि पृथ्वीवरील सूक्ष्मजीव इतर ग््राहांवर जाऊन तिथले वातावरण दूषित न करणे, हे पूर्णपणे यावरच अवलंबून आहे. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर एकच कपडा तो पार खराब होईपर्यंत सतत वापरतात. त्यानंतर तो कचरा म्हणून टाकून दिला जातो, जो पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना जळून खाक होतो. अंतराळ स्थानकावर अत्यंत कडक स्वच्छता राखली जात असली, तरी हाताने पकडण्याचे दांडे (Handrails) आणि हवेच्या व्हेंटच्या ( Air vents) नमुन्यांमध्ये सूक्ष्मजीवांची मोठी संख्या आढळून आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, हे सूक्ष्मजीव धातूच्या पृष्ठभागावर जगण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहेत. चंद्र किंवा मंगळाच्या भविष्यातील दीर्घकालीन मोहिमांमध्ये पृथ्वीवरून वारंवार कपड्यांचा किंवा वस्तूंचा पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे तिथेच कपडे स्वच्छ करणारी एक शाश्वत ‌‘स्पेस लाँड्री‌’ असणे अत्यंत गरजेचे आहे. महिनोन्‌‍ महिने चालणाऱ्या या मोहिमा अधिक सुसह्य करण्यासाठी स्लीपिंग बॅगऐवजी झोपायला गादी किंवा बसायला सोफा यांसारख्या आरामदायी गोष्टींची गरज भासेल; परंतु मानवी शरीरातून सतत बाहेर पडणाऱ्या सूक्ष्मजीवांसाठी या जागा प्रजननाचे केंद्र बनू शकतात. मानवी शरीरावरील बहुतेक सूक्ष्मजीव निरुपद्रवी किंवा फायदेशीर असले, तरी अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अंतराळातील विशिष्ट वातावरणामुळे (मायक्रोग््रॉव्हिटी) काही सूक्ष्मजीव स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. यामुळे अंतराळवीरांना आजार होण्याचा धोका तर वाढतोच, शिवाय हे सूक्ष्मजीव धातू गंजवून अंतराळ यानाच्या यंत्रणेचेही नुकसान करू शकतात. म्हणूनच हे नवीन प्लाझ्मा तंत्रज्ञान भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT