Global Warming Impact 
विश्वसंचार

Global Warming Impact : भीषण उष्णतेमुळे पृथ्वी आपल्या अक्षापासून सरकतेय

शास्त्रज्ञांचा मोठा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ग्लोबल वॉर्मिंग आणि विक्रमी उष्णतेमुळे आतापर्यंत तुम्ही फक्त हवामान बदलणे किंवा समुद्राची पातळी वाढण्याच्या बातम्या ऐकल्या असतील. परंतु, आता विज्ञानाच्या जगातून एक अत्यंत धक्कादायक बातमी आली आहे. मानवी हालचाली आणि प्रचंड उष्णतेमुळे पृथ्वीवरील बर्फ इतक्या वेगाने वितळत आहे की, आपली धरती स्वतःच्या अक्षापासून दूर सरकत आहे.

अमेरिकन अंतराळ संस्था ‌‘नासा‌’ आणि जगभरातील शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनातून हा खळबळजनक खुलासा झाला आहे. धुवीय प्रदेशांतील अब्जावधी टन बर्फ वितळल्यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत असून, तिच्या फिरण्याची गती आणि दिशा हळूहळू बदलत आहे. या संपूर्ण संकटाचे कारण स्पष्ट करताना शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या वजनाच्या संतुलनाचा दाखला दिला आहे. पृथ्वी एखाद्या भोवऱ्याप्रमाणे स्वतःच्या अक्षावर फिरते. जेव्हा भोवऱ्याच्या एखाद्या भागावर वजन वाढवले किंवा कमी केले जाते, तेव्हा तो डगमगू लागतो. नेमके हेच आपल्या पृथ्वीसोबत घडत आहे. हवामान बदलामुळे उत्तर आणि दक्षिण धुवांवर (ग््राीनलँड आणि अंटार्क्टिका) शतकानुशतके जमा झालेले ग्लेशियर्स वितळून पाणी होत आहेत. हे पाणी धुवांवरून निघून विषुववृत्ताकडे म्हणजेच समुद्राच्या इतर भागांत पसरत आहे. वजनातील या अचानक झालेल्या बदलामुळे पृथ्वी आपल्या अक्षापासून विचलित होण्यास भाग पडत आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, हा बदल एका रात्रीत झालेला नाही, तर गेल्या तीन दशकांत याचा वेग प्रचंड वाढला आहे. सॅटेलाईट डेटा आणि संशोधनानुसार, 1995 पूर्वी पृथ्वीचे भौगोलिक धुव दक्षिणेकडे सरकत होते. मात्र, बर्फ वितळण्याचा वेग वाढताच धुवांनी आपली दिशा बदलली आणि ते पूर्वेकडे सरकू लागले. 1995 ते 2020 या काळात धुव सरकण्याचा सरासरी वेग 1981 ते 1995 च्या तुलनेत तब्बल 17 पटीने जास्त नोंदवला गेला आहे.

पृथ्वी आता दरवर्षी काही सेंटिमीटरने आपल्या अक्षापासून दूर जात आहे. भौतिकशास्त्राच्या ‌‘कोणीय संवेग संरक्षण‌’ (Conservation of Angular Momentum) नियमानुसार, जेव्हा धुवांवरील बर्फ वितळून विषुववृत्ताजवळ जमा होतो, तेव्हा पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम होतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर याच वेगाने जागतिक तापमान वाढत राहिले, तर पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीत सूक्ष्म बदल होतील. याचा थेट परिणाम आपल्या ‌‘दिवसाच्या लांबीवर‌’ होईल. जरी हा बदल सेकंदाच्या काही लाखो भागाइतकाच लहान असणार असला, तरी भविष्यात यामुळे आपली अत्यंत संवेदनशील नेव्हिगेशन सिस्टीम (GPS) आणि सॅटेलाईटस्‌‍चे टाइमिंग पूर्णपणे बिघडू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT