Dental Surgery  
विश्वसंचार

Dental Surgery : ५९,००० वर्षांपूर्वी होत होती दातांवर शस्त्रक्रिया

आदिमानवाच्या उपचार पद्धतीचा मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

मॉस्को : रशियातील सायबेरिया भागातील ‘चागीरस्काया गुहे’त शास्त्रज्ञांना ५९,००० वर्षांपूर्वीचे एक अद्‌भुत गुपित सापडले आहे. येथे मिळालेल्या एका निएंडरथॉल मानवाच्या दातावर झालेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, आदिमानवाला देखील दातांचे उपचार करण्याचे प्रगत ज्ञान होते.

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील ही पहिली 'डेंटल सर्जरी' मानली जात आहे. संशोधकांना गुहेत एका प्रौढ निएंडरथॉलचा खालचा दाढ सापडला, ज्याला ‘चागीरस्काया ६४’ असे नाव देण्यात आले. या दाताच्या मध्यभागी एक मोठा आणि खोल खड्डा (कॅव्हिटी) होता, ज्याने दाताच्या नसांपर्यंतचा भाग पोखरला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या खड्ड्याच्या भोवती काही ओरखडे आणि खुणा होत्या. शास्त्रज्ञांनी जेव्हा पलोस वन मासिकात यावर अभ्यास प्रसिद्ध केला, तेव्हा समजले की हे ओरखडे इतर काही नसून एका टोकदार दगडाच्या हत्याराने दात कोरल्याचे पुरावे होते. गुहेत सापडलेली जास्पर दगडाची बारीक हत्यारे या कामासाठी वापरली असावीत. आधुनिक मानवाच्या दातांवर अशाच प्रकारच्या दगडांनी प्रयोग केला असता, तासाभरात हुबेहूब तशाच खुणा तयार झाल्या.

निएंडरथॉल मानवाची प्रगत बुद्धिमत्ता

या शोधामुळे निएंडरथॉल मानवांबद्दलचे जुने समज बदलले आहेत. ते केवळ रानटी नव्हते, तर त्यांना वेदनेचे मूळ समजण्याची आणि ती दूर करण्यासाठी योग्य तंत्रज्ञान वापरण्याची उत्तम जाण होती. ५९ हजार वर्षांपूर्वी कोणतीही भूल न देता, केवळ दगडाच्या साहाय्याने दाताची कठीण वेदना सहन करत हा उपचार पूर्ण केला गेला. तोंडात अशा प्रकारे काम करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची मदत आवश्यक असते. यावरून त्यांच्यात कौटुंबिक आणि सामाजिक काळजी घेण्याची भावना प्रगत होती हे स्पष्ट होते. हा शोध सिद्ध करतो की, शस्त्रक्रिया आणि उपचारांची मुळे केवळ आधुनिक मानवापुरती मर्यादित नसून, ती आपल्या पूर्वजांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच रुजलेली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT