तैवान : तैवानच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यांमध्ये संशोधकांनी एका ऐतिहासिक आणि विस्मयकारक शोधाची नोंद केली आहे. एका दशकाच्या अथक परिश्रमांनंतर, संशोधकांच्या एका पथकाने पूर्व आशियातील सर्वात उंच जिवंत झाड शोधून काढले आहे. तैवानमधील एका लांब नदीच्या खोऱ्यात विसावलेल्या या विस्तीर्ण 'तैवानिया फर' प्रजातीच्या झाडाला संशोधकांनी ‘हेवन सोर्ड ऑफ द दाआन रिव्हर’ असे नाव दिले आहे. प्रसिद्ध कादंबरीकार जिन योंग यांच्या मार्शल आर्टस् कादंबरीतील एका पौराणिक शस्त्रावरून हे नाव सुचवण्यात आले आहे.
चंद्राला स्पर्श करणारे झाड!
या महावृक्षाची उंची तब्बल ८४.१ मीटर (२७६ फूट) असून, त्याचे वय अंदाजे १,००० वर्षे असल्याचा अंदाज आहे. स्थानिक 'रुकाई' या आदिवासी जमातीमध्ये या सदाहरित वृक्षाला अतिशय आदराचे स्थान असून, ते याला ‘चंद्राला स्पर्श करणारे झाड’ म्हणून ओळखतात. जगातील सर्वात उंच झाड कॅलिफोर्नियातील ‘हायपेरियन’ (११६ मीटर) असले तरी पूर्व आशियाच्या दृष्टीने ‘हेवन सोर्ड' हा एक अभूतपूर्व शोध आहे.
अथक शोधमोहीम आणि आधुनिक तंत्रज्ञान
तैवानचा ६०% भाग जंगलांनी वेढलेला असून, तिथे सुमारे ९५ कोटी झाडे आहेत. अशा दाट जंगलात या झाडाचा शोध घेणे सोपे नव्हते. २०१४ पासून झाडांवर चढणारे व्यावसायिक, पर्यावरणवादी, भूगर्भशास्त्रज्ञ आणि रिमोट-सेन्सिंग तज्ज्ञ एकत्र आले. त्यांनी विमानांद्वारे ‘लायडार’ वापरून जंगलाचा त्रिमितीय नकाशा तयार केला.
या मोहिमेत नागरिक शास्त्रज्ञांची देखील मदत घेण्यात आली, ज्यामुळे चुकीची आकडेवारी बाजूला सारून अचूक निरीक्षणे नोंदवणे शक्य झाले. शेवटी, २०२२ च्या अखेरीस 'तैवान जायंट ट्री मॅप' प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये ६५ मीटरपेक्षा जास्त उंच असलेल्या ९४१ झाडांची नोंद केली गेली. २०२३ च्या सुरुवातीला या पथकाने सर्वात उंच झाडाच्या दिशेने प्रवास सुरू केला. २० किलोमीटरहून अधिक अंतर पोहत आणि खडकांवरून चढत पार केल्यानंतर, दोन दिवसांच्या कठीण ट्रेकिंगनंतर ते ‘हेवन सोर्ड’ पाशी पोहोचले. ड्रोनच्या साहाय्याने प्राथमिक पाहणी केल्यानंतर, तज्ज्ञांनी पारंपरिक पद्धतीने झाडाच्या शिखरावरून थेट मोजपट्टी खाली सोडून याची अचूक उंची ८४.१ मीटर असल्याचे सिद्ध केले.