Educational Technology | गैरहजर राहणाऱ्या मुलांसाठी शाळेने आणले ‘रोबो’ 
विश्वसंचार

Educational Technology | गैरहजर राहणाऱ्या मुलांसाठी शाळेने आणले ‘रोबो’

ब्रिटनमधील अनेक हायस्‍कूलमध्‍ये अनोखा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

लंडन : शाळेत जाण्याची तीव्र भीती किंवा चिंता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिटनमध्ये एक नवीन आणि नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यात आला आहे. शाळेत प्रत्यक्ष जाण्यास असमर्थ असलेल्या मुलांसाठी आता ३,५०० पौंड (अंदाजे ३.७५ लाख रुपये) किमतीचे ‘एव्ही१’ रोबो मागवण्यात येत आहेत. हे ‘रोबो’ विद्यार्थ्यांच्या जागेवर बाकड्यावर बसून त्यांचे ‘प्रतिनिधित्त्व’ करतात, ज्यामुळे मुलांना घरबसल्या शाळेतील तासांमध्ये सहभागी होणे शक्य होते.

रोबो कसे काम करतात?

नॉर्वेच्या ‘नो आयसोलेशन’ या कंपनीने हे रोबोटस्‌ विकसित केले आहेत. या रोबोटमध्ये कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्पिकर दिलेला असतो. घरी बसलेला विद्यार्थी ॲपच्या माध्यमातून शिक्षकांचे शिकवणे ऐकू शकतो, पाहू शकतो आणि प्रश्न विचारू शकतो. विद्यार्थी स्क्रीन स्वाइप करून रोबोटचे डोके ३६० अंशात फिरवू शकतात. तसेच ‘व्हिस्पर मोड’च्या मदतीने अनुपस्थित मुले आपल्या शेजारी बसलेल्या वर्गमित्राशी हळूच बोलू शकतात, जेणेकरून पूर्ण वर्गाला आवाज जाणार नाही. यात कॅमेरा वन-वे असल्यामुळे मूल घरून सर्व पाहू शकते; पण वर्गातील मुलांना त्याचे घर दिसत नाही.

कोरोना महामारीनंतर ब्रिटनमध्ये मुलांच्या शाळा बुडण्याचे प्रमाण चिंताजनक रीतीने वाढले आहे. अतिरिक्त सामाजिक आणि भावनिक गरज असलेल्या गैरहजर राहणार्‍या मुलांची संख्या गेल्या सहा वर्षांत तिप्पट झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी डेव्हन, सॉमरसेट, डोसेंट आणि लंडनच्या विविध भागांतील किमान ८० हून अधिक स्थानिक नगर परिषदांनी (Councils) हे रोबोटस्‌ खरेदी केले आहेत. देशभरात सध्या २,००० हून अधिक रोबोटस्‌चा वापर केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या अनुभवात सुधारणा

इसेक्समधील मोल्शम हायस्कूलमध्ये या रोबोटस्‌चा वापर यशस्वी ठरला आहे. तिथल्या एका ११ वीच्या विद्यार्थ्याने सांगितले की, तीव्र चिंतेमुळे तो काही महिने शाळेत जाऊ शकला नव्हता; परंतु या रोबोटमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि आता तो नियमितपणे शाळेत उपस्थित राहत आहे. विकासकांच्या मते, या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ७६ टक्के विद्यार्थ्यांनी पुन्हा थेट वर्गात येण्यास सुरुवात केली आहे. शिक्षकांचा ताण कमी करून विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT