वॉशिंग्टन : शनीचा चंद्र एन्सिलाडस आकाराने जरी लहान असला, तरी त्याचा विद्युत चुंबकीय प्रभाव वैज्ञानिकांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने दूरपर्यंत पसरलेला आहे. ‘नासा’च्या ‘कॅसिनी’ मोहिमेतून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे संशोधकांनी एन्सिलाडसशी जोडलेल्या विद्युत चुंबकीय लहरींचा शोध कमीत कमी ५.०४ लाख किलोमीटर अंतरापर्यंत लावला आहे.
हे अंतर एन्सिलाडसच्या व्यासाच्या जवळपास एक हजार पट आहे आणि पृथ्वीपासून चंद्राच्या सरासरी कमाल अंतरापेक्षाही जास्त आहे. ही कोणतीही बर्फाची किंवा घनावस्थेतील रचना नसून शनीचे चुंबकीय क्षेत्र आणि प्रभारित कण (प्लाझ्मा) यांच्यातील गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अभ्यासात याला ‘ॲल्फव्हेन विंग’शी जोडलेली तरंगरचना म्हणून ओळखले गेले आहे.
एन्सिलाडसचा व्यास केवळ ५०४ किलोमीटर आहे. त्याच्या दक्षिण ध्रुवाजवळील भेगांमधून पांढरी वाफ, बर्फाचे कण आणि इतर घटक सातत्याने अंतराळात फेकले जातात. हे कण प्रभारित होऊन शनीच्या सभोवतालच्या प्लाझ्मामध्ये मिसळतात. यामुळे एन्सिलाडसच्या कक्षेत प्लाझ्माचे विशाल क्षेत्र तयार होते. शनीचे शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र या प्लाझ्माला स्वतःसोबत फिरवते. हा प्रवाह जेव्हा एन्सिलाडसवर आदळतो, तेव्हा तिथे चुंबकीय क्षेत्रात मोठे बदल घडून येतात आणि विद्युत प्रवाह निर्माण होतो. याच प्रक्रियेतून ‘ॲल्फव्हेन लहरी’ तयार होतात, ज्या चुंबकीय रेषेच्या बाजूने खूप दूरपर्यंत पसरतात. वैज्ञानिक स्पष्ट करतात की, ५.०४ लाख किलोमीटर ही या प्रभावाची अंतिम सीमा नाही, तर ही किमान प्रमाणित केलेली नोंद आहे. एन्सिलाडसचा विद्युत चुंबकीय प्रभाव यापेक्षाही पुढे पसरलेला असण्याची दाट शक्यता आहे.