वॉशिंग्टन : शनी ग्रहाला पाहण्याची सर्वोत्तम वेळ जवळ आली आहे! रविवार, 21 सप्टेंबरला, शनी ग्रह ‘ऑपोजिशन’ म्हणजेच प्रतियुती या स्थितीमध्ये पोहोचणार आहे. या स्थितीमध्ये पृथ्वी शनी आणि सूर्याच्या अगदी मध्ये येईल, म्हणजेच पृथ्वीपासून पाहिल्यास सूर्य आणि शनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील. यामुळे सूर्य, पृथ्वी आणि शनी हे तिघेही एका सरळ रेषेत येतील. प्रतियुतीमुळे शनी ग्रह आकाराने सर्वात मोठा आणि तेजस्वी दिसेल, कारण तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे, सूर्याच्या प्रकाशात तो पूर्णपणे प्रकाशित झालेला दिसेल. ही घटना दर 378 दिवसांनी एकदाच घडते.
21 सप्टेंबर रोजी शनीला पाहण्यासाठी वातावरण खूप अनुकूल असेल. या दिवशी चंद्र अमावास्येच्या स्थितीत असल्याने, चंद्राचा प्रकाश शनीच्या तेजाला कमी करणार नाही. शनी थेट सूर्याच्या विरुद्ध दिशेला असल्याने तो रात्रभर दिसेल. स्थानिक वेळेनुसार, तो सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेला उगवेल आणि सूर्योदयाच्या वेळी पश्चिमेला मावळेल. अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी काही टिप्स: शहरातील कृत्रिम दिव्यांपासून दूर अशा अंधार्या जागेची निवड करा, कारण हे दिवे आकाशातील खगोलांचे तेज कमी करतात. डोळ्यांना अंधाराची सवय होण्यासाठी 15 ते 30 मिनिटे थांबा.
जर टॉर्चचा वापर करायचा असल्यास, पांढर्याऐवजी लाल रंगाचा प्रकाश वापरा, जेणेकरून डोळ्यांची रात्र द़ृष्टी टिकून राहील. शनी ग्रह ‘मीन’ या नक्षत्राच्या तळाशी दिसेल. तो खूप तेजस्वी असल्याने, तुम्ही त्याला आकाशात सहज ओळखू शकता. मदत हवी असल्यास, ‘स्टेलॅरियम’ सारख्या अॅप्सचा वापर करू शकता. शनीला पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुर्बिण किंवा टेलिस्कोप वापरणे. या उपकरणांच्या मदतीने तुम्हाला शनीची सुंदर कडी स्पष्ट दिसतील. या काळात ‘सीलिगर इफेक्ट’ नावाच्या घटनेमुळे शनीची कडी जास्त तेजस्वी दिसतात.