Satellite Traffic Jam | अवकाशात उपग्रहांचा ट्रॅफिक जाम! 
विश्वसंचार

Satellite Traffic Jam | अवकाशात उपग्रहांचा ट्रॅफिक जाम!

१ लाख सॅटेलाईटस्‌चे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी ‘एआय’वर शास्त्रज्ञांची भिस्त

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांची संख्या झपाट्याने वाढत असून, येत्या काही वर्षांत ती १ लाखांहून अधिक होण्याची शक्यता आहे. सध्या पृथ्वीच्या कक्षेत सुमारे १६ हजार उपग्रह कार्यरत आहेत. या वाढत्या गर्दीमुळे अपघात, अवकाशातील कचरा आणि उपग्रहांच्या सुरक्षिततेसंदर्भातील आव्हाने गंभीर बनत आहेत. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि फेडरेटेड लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रह स्वतःच स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतील, अशा प्रणाली विकसित करत आहेत.

उपग्रहांवरच आज जीपीएस, हवामान अंदाज, इंटरनेट सेवा, बँकिंग व्यवहार, दूरसंचार, आपत्कालीन सेवा आणि संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. दर काही आठवड्यांनी नवीन उपग्रह प्रक्षेपित होत असल्याने पृथ्वीची कक्षा अधिकच गजबजत आहे. काही तज्ज्ञांच्या मते, या दशकाच्या अखेरीस उपग्रहांची संख्या १ लाख, तर काही अंदाजानुसार २०३० पर्यंत ६० हजारांहून अधिक होऊ शकते.

वाढती गर्दी, वाढते धोके

उपग्रहांची वाढती संख्या म्हणजे अवकाशातील वाहतूकही वाढणार. त्यामुळे उपग्रहांमध्ये धडक होण्याचा धोका वाढत आहे. अशा धडकांमधून निर्माण होणारा अवकाशातील कचरा पुढे आणखी धडकांना कारणीभूत ठरू शकतो. यालाच ‘केसलर सिंड्रोम’ म्हटले जाते. अशी साखळी निर्माण झाल्यास पृथ्वीभोवती कचऱ्याचे जाळे तयार होऊन भविष्यात उपग्रह प्रक्षेपण आणि अवकाश मोहिमा धोक्यात येऊ शकतात.

उपग्रहांची दुरुस्ती शक्य नसल्याने एआयवर भर

पृथ्वीवरील वाहनांप्रमाणे उपग्रहांना दुरुस्तीसाठी परत आणता येत नाही. एकदा अवकाशात गेल्यानंतर त्यांना तीव्र किरणोत्सर्ग, तापमानातील मोठे बदल आणि इतर प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे त्यांची बॅटरी, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आणि इतर उपकरणे कालांतराने खराब होऊ लागतात. सध्या अभियंते पृथ्वीवरून उपग्रहांकडून मिळणाऱ्या टेलिमेट्री डेटाचे विश्लेषण करून बिघाडाची चिन्हे शोधतात. मात्र, हजारो उपग्रहांचे निरीक्षण मानवी पातळीवर करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

एआय ओळखणार बिघाडाची पूर्वसूचना

संशोधकांनी विकसित केलेली एआय प्रणाली उपग्रहांच्या बॅटरीतील सूक्ष्म बदल, ऊर्जा वापर, तापमान आणि इतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संभाव्य बिघाडाचा अंदाज आधीच लावू शकते. त्यामुळे उपग्रहाचे कार्य बदलणे, ऊर्जा बचत करणे किंवा आवश्यक प्रणाली तात्पुरती बंद ठेवणे शक्य होईल. यामुळे उपग्रहांचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.

उपग्रह एकमेकांकडूनही शिकणार

संशोधक फेडरेटेड लर्निंग तंत्रज्ञानावरही काम करत आहेत. या प्रणालीमध्ये प्रत्येक उपग्रह स्वतःच्या अनुभवातून शिकेल आणि संपूर्ण कच्चा डेटा पृथ्वीवर पाठविण्याऐवजी महत्त्वाची माहिती इतर उपग्रहांशी किंवा नियंत्रण केंद्राशी शेअर करेल. त्यामुळे हजारो उपग्रहांचे आरोग्य अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने तपासता येईल. तज्ज्ञांच्या मते, एआय सर्व समस्या सोडवू शकत नाही. अवकाशातील कचरा कमी करणे, उपग्रहांमधील सुरक्षित अंतर राखणे आणि स्वयंचलित निर्णय प्रणाली अधिक विश्वासार्ह बनविणे ही मोठी आव्हाने कायम आहेत. तरीही भविष्यातील वाढत्या उपग्रहसंख्येचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यासाठी एआय हे अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान ठरणार असल्याचे संशोधकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT