वॉशिंग्टन ः कॅलिफोर्नियातील ‘स्पिनलाँच’ या खासगी स्टार्टअप कंपनीने एक क्रांतिकारी योजना आखली आहे. ते शेकडो सपाट ‘मायक्रोसॅटेलाइटस्’ (उपग्रह) एकाच वेळी पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत ( Low- Earth Orbit) प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहेत. हे उपग्रह रॉकेटस्द्वारे नव्हे, तर एका महाकाय सेंट्रीफ्यूगल तोफेमार्फत (centrifugal cannon) अंतराळात झेपावले जाणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही ‘पॅनकेक‘ आकारातील उपग्रहांची पहिली तुकडी पुढील वर्षातच प्रक्षेपित केली जाऊ शकते आणि यामुळे एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपणाचा नवा विक्रम नोंदवला जाऊ शकतो.
‘स्पिनलाँच’ ही कंपनी रॉकेटच्या पारंपरिक इंधनाचा वापर न करता, अंतराळात वस्तू पाठवण्यासाठी ‘स्पिनिंग आर्म्स‘ वापरते. या यंत्रणा व्हॅक्युम-सीलबंद चेंबरमध्ये अतिजलद फिरून उपग्रहांना एक बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त वेगाने वर झेपावतात. या अनोख्या पद्धतीमुळे प्रक्षेपणाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. ‘स्पिनलाँच’ स्वतःचे ‘मेरिडियन स्पेस’ ( Meridian Space)) नावाचे सॅटेलाईट कॉन्स्टेलेशन तयार करत आहे, जे ‘स्पेसएक्स’च्या ‘स्टारलिंक’ नेटवर्कला स्वस्त व पर्यायी सेवा देईल. 3 एप्रिल रोजी कंपनीने जाहीर केले की, त्यांना ‘कोंग्सबर्ग डिफेन्स अँड एरोस्पेस’ ( KDA) कडून 12 मिलियन डॉलर्स निधी प्राप्त झाला आहे, ज्यामुळे एकूण गुंतवणूक 150 मिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे.
याच दिवशी ‘केडीए’ अंतर्गत ‘नॅनोएव्हिओनिक्स’ या कंपनीने सांगितले की, ‘मेरिडियन स्पेस’ साठीच्या 250 उपग्रहांची निर्मिती ते करतील. हे उपग्रह 2026 मध्ये एका in- orbit demonstration मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. ‘नॅनोएव्हिओनिक्स’ ने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व उपग्रह सपाट चकतीसारखे असतील, अगदी ‘पॅनकेक’सारखे आणि प्रक्षेपणाच्या वेळी एकमेकांवर ठेवले जातील. प्रत्येक उपग्रहाची रुंदी 2.2 मीटर (7.5 फूट) आणि वजन सुमारे 70 किलोग्रॅम असेल, जे ‘स्पेसएक्स’ च्या 800 किलो वजनाच्या ‘स्टारलिंक व्ही-2’ उपग्रहांपेक्षा खूपच हलके आहेत. जर हे सर्व 250 उपग्रह यशस्वीपणे एकाच वेळी पृथ्वीनजीकच्या कक्षेत पोहोचले, तर ते ‘स्पेसएक्स’चा 2021 मधील 143 उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा विक्रम मागे टाकतील.