वॉशिंग्टन : येत्या दशकात प्रक्षेपित होणार्या अतिप्रकाशमान उपग्रहांच्या समूहामुळे रात्रीचे आकाश सध्याच्या तुलनेत तीन पटीने अधिक उजळ होण्याची भीती एका नवीन अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे ‘वेरा सी. रुबिन’सारख्या वेधशाळांमार्फत केल्या जाणार्या संपूर्ण आकाशाच्या सर्वेक्षणात मोठे अडथळे येऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
सध्या पृथ्वीभोवती हजारो उपग्रह फिरत आहेत आणि भविष्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे उपग्रह अंतराळातील फोटोंमध्ये ‘फोटोबॉम्बिंग’ करून अडथळे निर्माण करत आहेत. ‘रीदर्ळीं’ या सर्व्हरवर प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, हे टाळण्यासाठी उपग्रह कंपन्यांनी त्यांच्या उपग्रहांचा आकार आणि ब्राईटनेस (तेजस्विता) यावर कडक मर्यादा पाळणे आवश्यक आहे. 2021 मध्ये संशोधकांनी अशी शिफारस केली होती की, 550 किलोमीटर उंचीवर असलेल्या उपग्रहांची द़ृश्यमान तीव्रता किमान 7 असावी (कमी आकडा म्हणजे जास्त तेजस्विता). जर्मनीतील युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीचे खगोलशास्त्रज्ञ ऑलिव्हियर हैनॉट यांच्या मते, तीव्रता 7 असणे म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात अंधूक उपग्रह होय. तथापि, परिस्थिती अधिक बिघडण्याची चिन्हे आहेत.
अंतराळतज्ज्ञ जोनाथन मॅकडोवेल यांच्या माहितीनुसार, आगामी काही वर्षांत सुमारे 17 लाख उपग्रह प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे. काही उपग्रह त्यांच्या अवाढव्य आकारामुळे समस्या निर्माण करत आहेत. उदाहरणार्थ : AST SpaceMobile चे उपग्रह : यांचे ब्ल्यूवॉकर आणि ब्ल्यूवर्ड उपग्रह एका मोठ्या स्टुडिओ अपार्टमेंट किंवा टेनिस कोर्टच्या आकाराचे आहेत. Reflect Orbital चे आरसे: ही कंपनी रात्रीच्या वेळी सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी अंतराळात महाकाय आरसे बसवणार आहे. हे आरसे इतके परावर्तित असतील की ते आकाशात ’खोट्या तार्यांसारखे’ भासतील. खगोलशास्त्रीय कॅमेरे दूरवरच्या खगोलीय वस्तूंचा प्रकाश टिपण्यासाठी ‘लो शटर स्पीड’चा वापर करतात. जेव्हा हे अत्यंत तेजस्वी उपग्रह कॅमेर्यासमोरून जातात, तेव्हा फोटोंमध्ये प्रकाशाचे मोठे पट्टे उमटतात. यामुळे अंतराळातील महत्त्वाचा डेटा आणि प्रतिमा खराब होत आहेत, ज्यामुळे विश्वाचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.