सोनभद्र (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील रघुनाथपूर या छोट्याशा गावात दररोज सकाळी 7 वाजता एक ई-रिक्षा गल्लीबोळातून फिरताना दिसते. विशेष म्हणजे, या रिक्षाचे सारथ्य खुद्द गावचे सरपंच परमेश्वर पाल करत असतात. कोणत्याही सरकारी आदेशाशिवाय, केवळ आपल्या गावाप्रती असलेल्या प्रेमापोटी त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाने रघुनाथपूरला परिवर्तनाची एक नवी दिशा दाखवली आहे. सुमारे 2,500 लोकसंख्या असलेल्या रघुनाथपूरची स्थितीही पूर्वी इतर सामान्य गावांसारखीच होती. सांडपाण्याच्या नाल्या प्लास्टिकने तुंबलेल्या होत्या आणि सार्वजनिक ठिकाणी कचर्याचे ढीग साचलेले असायचे. केवळ कागदावर आदेश देऊन गाव सुधारणार नाही, हे उमजल्यावर सरपंच परमेश्वर पाल यांनी स्वतः घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचा निर्णय घेतला.
बदलाचा हा प्रवास सोपा नव्हता, असे परमेश्वर पाल सांगतात. सुरुवातीला त्यांनी कचरा जमा करण्यासाठी गोणी वाटल्या, तेव्हा अनेकांनी त्या फेकून दिल्या. काहींनी तर या कामाची थट्टाही केली. मात्र, सरपंचांनी कोणावरही दंड न आकारता किंवा कोणालाही न रागावता संवादाचा मार्ग निवडला. ते प्रत्येक दारावर गेले आणि प्लास्टिकमुक्त गाव ही सर्वांची जबाबदारी असल्याचे पटवून दिले. गावातील 300 हून अधिक कुटुंबे आता स्वतःहून कचरा वर्गीकरण करून सरपंचांकडे देतात. आतापर्यंत गावातून 200 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा हटवण्यात आला आहे. पुनर्चक्रण केलेल्या कचर्यातून पंचायतीने 2,000 रुपयांचा महसूल मिळवला आहे. ही रक्कम छोटी वाटत असली, तरी त्यामागील संदेश खूप मोठा आहे. घोरावल ब्लॉकच्या या गावात आता स्वच्छतेची यंत्रणा शिस्तबद्ध झाली आहे.
दररोज सकाळी सरपंच ई-रिक्षा घेऊन निघतात, घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करतात आणि ते ‘रिसोर्स रिकव्हरी सेंटर’ला नेले जाते. तिथे कचर्याचे वर्गीकरण करून रिसायकल होणार्या वस्तूंची विक्री केली जाते आणि उर्वरित कचर्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. परमेश्वर पाल यांच्या या जिद्दीची आता सरकारी स्तरावरही दखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पेयजल आणि स्वच्छता विभागाने त्यांच्या कामाचा गौरव करत, इतर गावांसाठी ते एक आदर्श असल्याचे म्हटले आहे. ‘माझा उद्देश केवळ साफसफाई करणे हा नाही, तर स्वच्छतेची ही सवय गावातील लोकांच्या रक्तामध्ये भिनावी, अशी माझी इच्छा आहे,’ असे मनोगत सरपंच परमेश्वर पाल यांनी व्यक्त केले.