वॉशिंग्टन : संत ज्ञानेश्वरांच्या भगवद्गीतेवरील मराठी भाष्य असलेल्या ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या शेवटी ‘पसायदान’ ही सुंदर प्रार्थना येते. संत ज्ञानेश्वरांनी यामधून विश्वात्मक परमेश्वराकडे सर्वांच्या कल्याणासाठीची प्रार्थना केलेली आहे. आता याच पसायदानावर तयार करण्यात आलेली सांगीतिक रचना ही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडत्या रचनांच्या यादीत समाविष्ट झालेली आहे.
ओबामा हे आजही जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक असून, सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय आहेत. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेले ओबामा हेसुद्धा ज्ञानेश्वरांच्या रचनांचे चाहते आहेत असं सांगितलं, तर तुम्हाला आधी यावर कदाचित विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे आणि ही माहिती स्वत: ओबामा यांनी दिली आहे. ओबामांचं थेट मराठी आणि त्यातही ज्ञानेश्वरांच्या रचनांशी काय कनेक्शन आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुम्ही ओबामांनी शेअर केलेली एक यादी वाचायलाच हवी.
खरं तर बराक ओबामा दर वर्षाच्या शेवटच्या 15 दिवसांमध्ये त्यांनी वर्षभरात वाचलेली पुस्तके, पाहिलेले चित्रपट आणि ऐकलेल्या गाण्यांपैकी आवडलेल्या गोष्टींची यादी शेअर करतात. अगदी इंग्रजीपासून ते अनुवादित साहित्यापर्यंत अनेक गोष्टी ओबामा वाचतात. असाच प्रकार चित्रपटांसंदर्भात आहे. ओबामांना कलेविषयी विशेष आवड असल्याने ते वेगवेगळ्या भाषांमधील गाणी ऐकतात. याच गाण्यांपैकी त्यांना 2025 मध्ये आवडलेली अव्वल 30 गाणी कोणती, हे एक पोस्ट शेअर करत फॉलोअर्सला सांगितलं आहे.
याच गाण्यांच्या यादीमध्ये ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा समावेश ओबामांनी केला आहे. गणव्य नावाच्या अमेरिकन गायिकेनं ज्ञानेश्वरांच्या पसायदान या प्रार्थनेचे संगीतबद्ध रूप तयार केले आहे, ते ओबामा यांना एवढं आवडलं आहे की, त्याचा त्यांनी या वर्षीच्या आपल्या टॉप 30 गाण्यांमध्ये समावेश केला आहे. ओबामांकडून सांगितली जाणारी गाणी मोठ्या संख्येनं ऐकली जातात आणि त्यांची चर्चा होते. त्यामुळेच आता ‘पसायदान’ हे अधिकाधिक इंग्रजी लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.