सांगली जिल्हा बँक pudhari File Photo
विश्वसंचार

सांगली : केन अ‍ॅग्रोकडून सात वर्षांत होणार 225 कोटींची वसुली

वसुली प्लॅन ‘एनसीएलटी’कडून मंजूर ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : केन अ‍ॅग्रो एनर्जी लि., रायगाव या कंपनीच्या साखर कारखान्याकडे जिल्हा बॅँकेची 160 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी बँक व कारखान्याच्या सहमती राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (एनसीएलटी) सादर करण्यात आलेला 225 कोटींचा रिझोल्यूशन प्लॅन (वसुली प्लॅन) न्या. रिता कोहली व न्या. मधू सिन्हा यांनी मंजूर केला आहे. येत्या सात वर्षांत हप्त्या-हप्त्याने ही रक्कम कारखान्याकडून वसूल होणार आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेला दिलासा मिळाला असून एनपीए कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

या कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने 160 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याच्या वसुलीसाठी बॅँकेने सरफेसी अ‍ॅक्टअंतर्गत कारखान्याच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला होता. दरम्यान, कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. यानंतर एनसीएलटीने या कारखान्यावर रिझोल्यूशन प्रोफेशनल (व्यावसायिक) नियुक्त केला. त्यांच्यासमोर सुनावणीवेळी बँकेने दावा दाखल केला. कारखान्याने एनसीएलटीमार्फत जिल्हा बॅँकेला 225 कोटी 68 लाख 86 हजार रुपयांचा वसुली प्लॅन (रिझोल्यूशन प्लॅन) सादर केला. यावर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात चर्चा झाली. यावेळी केन अ‍ॅग्रोचा 160 कोटी रुपये मुद्दल व व्याज असा 225 कोटी 68 लाख 86 हजार रुपयांचा रिझोल्यूशन प्लॅन अटींसह मंजूर करण्यात आला. तसेच मुदलाची रक्कम 160 कोटींवर सहा टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. यासह उर्वरित व्याज वसूल होणार आहे. ही रक्कम परतफेड करण्यासाठी पुढील सात वर्षे हप्ते पाडून देण्यात येणार आहेत.

हा रिझोल्यूशन प्लॅन एनसीएलटीपुढे सादर केला होता. मात्र जवळपास दोन वर्षे यावर सुनावणी सुरू होती. 3 जानेवारी 2025 रोजी याप्रकरणी झालेल्या सुनावणीत एससीएलटीने युक्तिवाद संपवत हे प्रकरण निकालावर ठेवले. या प्लॅनच्या विरोधात दाखल केलेल्या काही याचिका पूर्वीच एनसीएलटीने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे सदरचा रिझोल्यूशन प्लॅन एकप्रकारे मंजूर झाला होता, मात्र अंतिम निकाल झालेला नव्हता. सोमवारी न्या. रिता कोहली व न्या. मधू सिन्हा यांनी निकालपत्रावर सही करीत या वसुली प्लॅनवर शिक्कामोर्तब केले.

केन अ‍ॅग्रो कंपनीच्या साखर कारखान्याकडील 225 कोटी 68 लाख 86 हजार रुपये वसुलीबाबत एनसीएलटीकडे दाखल केलेल्या प्लॅनवर शिक्कामोर्तब झाले आहे. न्यायमूर्तींनी निकालपत्रावर सही केली आहे. दोन दिवसात न्यायालयाचा आदेश बॅँकेला प्राप्त होईल. या कारखान्याकडे कर्जाचे 160 कोटी रुपये मुद्दल आहे. व्याजासह सात वर्षांत 225 कोटी रुपये वसूल होणार आहेत.
शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT