San francisco bay | सॅन फ्रान्सिस्कोचे आखात बनलेय ग्रे व्हेलसाठी मृत्यूचा सापळा 
विश्वसंचार

San francisco bay | सॅन फ्रान्सिस्कोचे आखात बनलेय ग्रे व्हेलसाठी मृत्यूचा सापळा

पुढारी वृत्तसेवा

सॅन फ्रान्सिस्को : ऐतिहासिकद़ृष्ट्या सॅन फ्रान्सिस्कोच्या आखातात क्वचितच दिसणारे ग्रे व्हेल आता येथे मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, हे आखात त्यांच्यासाठी सुरक्षित न ठरता जीवघेणे ठरत आहे. एका ताज्या संशोधनानुसार, या आखातात येणार्‍या व्हेलचा मृत्युदर अत्यंत चिंताजनक असून, जहाजांची धडक हे त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

2018 ते 2025 या काळात आखातात शिरलेल्या एकूण ग्रे व्हेलपैकी किमान 18 टक्के व्हेलचा मृत्यू झाला आहे. संशोधकांच्या मते, हा आकडा प्रत्यक्षात 40 ते 50 टक्क्यांपर्यंत असू शकतो, कारण अनेक मृतदेह समुद्रात वाहून जातात किंवा कुजल्यामुळे त्यांची ओळख पटत नाही. एकूण मृत्यूंपैकी 40 टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये ब्लंट फोर्स ट्रॉमा (जहाजाच्या धडकेमुळे होणारी गंभीर दुखापत) हे मृत्यूचे कारण असल्याचे आढळले आहे. ग्रे व्हेलची एकूण संख्या सध्या सुमारे 13,000 वर आली आहे, जी 1970 नंतरची सर्वात कमी नोंद आहे.

स्थलांतराचा मार्ग का बदलला?

सामान्यतः हे व्हेल मेक्सिकोच्या ऊबदार पाण्यापासून आर्क्टिक समुद्रापर्यंत 10,000 मैलांचा प्रवास करतात. अभ्यासाच्या प्रमुख लेखिका जोसी स्लॅथॉग यांच्या मते, आर्क्टिकमधील हवामान बदलामुळे व्हेलच्या अन्नाचे स्रोत बदलले आहेत. भुकेमुळे हे व्हेल अन्नाच्या शोधात सॅन फ्रान्सिस्कोच्या आखातात शिरत आहेत, जे एक अत्यंत गजबजलेले व्यापारी जलमार्ग आहे.

मरीन मॅमल सेंटरीह संस्थेने व्हेल स्मार्ट नावाचा कार्यक्रम सुरू केला असून, याद्वारे जहाज चालकांना व्हेलच्या हालचाली ओळखून अपघात टाळण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. काही कंपन्यांनी व्हेल शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. सेंटर फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी या संस्थेने अमेरिकन कोस्ट गार्डवर खटला दाखल केला आहे. जहाजांच्या मार्गामुळे समुद्री जीवांना होणार्‍या हानीचे योग्य विश्लेषण न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ वकील कॅथरीन किल्डफ यांनी सांगितले की, ‘केवळ ऐच्छिक वेगमर्यादा पाळून व्हेलचा जीव वाचवता येणार नाही. सरकारने जहाजांसाठी अनिवार्य वेगमर्यादा लागू करणे आवश्यक आहे.’ जर मानवी हस्तक्षेप योग्य प्रकारे नियंत्रित केला, तर या व्हेलची संख्या पुन्हा पूर्ववत होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT