नवी दिल्ली : नवी उत्क्रांती आणि आपल्या पूर्वजांचा शोध घेताना संशोधकांना एक अत्यंत महत्त्वाचा दुवा सापडला आहे. नामिबियातील 'सान' समुदायाचा ‘डीएनए’ जगातील सर्वात प्राचीन मानवी डीएनएपैकी एक असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. या निष्कर्षामुळे मानवी इतिहासाची पाने पुन्हा एकदा उलगडली जात आहेत.
वैज्ञानिक संशोधनानुसार, 'सान' समुदायाचे लोक हे आफ्रिकेतील मूळ रहिवासी असून, ते इतर मानवी समूहांपासून साधारणत: १ लाख ते दीड लाख वर्षांपूर्वी वेगळे झाले असावेत. जनुकीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हा समुदाय मानवी इतिहासाच्या सुरुवातीच्या काळातील वैशिष्ट्ये आजही टिकवून आहे. त्यांच्या डीएनएमध्ये होणारे बदल हे इतर मानवी समूहांच्या तुलनेत खूपच कमी आणि मूळ स्वरूपाशी जवळ जाणारे आहेत.
मानवी स्थलांतराचा आधार
जेव्हा मानव आफ्रिकेतून बाहेर पडून जगाच्या इतर भागात स्थलांतरित झाला, तेव्हाच्या प्रक्रियेत 'सान' समुदाय इतर प्रवाहातून वेगळा झाला. म्हणूनच या समुदायाचा जनुकीय अभ्यास करणे, मानवाच्या मूळ उत्पत्तीबद्दल माहिती मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या समुदायाची जीवनशैली, भाषा आणि शारीरिक वैशिष्ट्ये हीदेखील त्यांच्या प्राचीन जनुकीय वारशाची साक्ष देतात.
संशोधनाचे महत्त्व
हे संशोधन केवळ 'सान' समुदायापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण मानवजातीची उत्क्रांती समजून घेण्यासाठी एक पाया आहे. मानवी मेंदूचा विकास, रोगप्रतिकारकशक्ती आणि स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आता या प्राचीन डीएनएचा अभ्यास करत आहेत.