Samples from asteroid Bennu brought to Earth
‘बेन्नू’ लघुग्रहावरून खडक-मातीचे नमुने आणण्यात आलेले आहेत.  Pudhari File Photo
विश्वसंचार

समुद्र असलेल्या ग्रहापासून वेगळा झाला होता ‘बेन्नू?’

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘बेन्नू’ नावाच्या लघुग्रहावरून तेथील खडक-मातीचे नमुने आणण्यात आलेले आहेत. सध्या या नमुन्यांचे विश्लेषण करून त्याचा अभ्यास केला जात आहे. त्यावरून संशोधकांना दिसून आले की, या लघुग्रहाचा भूतकाळ अतिशय मोठ्या प्रमाणातील पाण्याशी संबंधित आहे. हा लघुग्रह म्हणजे एखाद्या समुद्र असलेल्या ग्रहापासून वेगळा झालेला तुकडा असावा, असे संशोधकांना वाटते.

‘नासा’ने बेन्नू’चे 121.6 ग्रॅमचे नमुने आणले पृथ्वीवर

‘नासा’ने ‘ओसिरिस-रेक्स’ हे यान या लघुग्रहावर उतरवून तेथील हे नमुने गोळा केले होते व ते पृथ्वीवरही आणले होते. ‘बेन्नू’चे 121.6 ग्रॅमचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे यान नमुने घेऊन पृथ्वीवर परतले होते. वैज्ञानिक त्यावेळेपासूनच लघुग्रहाच्या या खडक-मातीचा अभ्यास करीत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. तसेच बेन्नूच्या धुळीत नायट्रोजन व कार्बनिक घटक मोठ्या प्रमाणात असल्याचेही दिसून आले. याच घटकांनी आपली सौरमालिका बनवण्यात मदत केली होती. तसेच हे घटकच जीवसृष्टीसाठीही महत्त्वाचे ठरतात. मेरीलँडच्या ग्रीनबेल्टमधील ‘नासा’च्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमधील वैज्ञानिक जेसन ड्वार्किन यांनी याबाबतची माहिती दिली. या मोहिमेतून जे अपेक्षित होते तेच मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. या नमुन्यांमध्ये मॅग्नेशियम-सोडियम फॉस्फेट मिळणे हे सर्वाधिक आश्चर्याचे होते. हा एक असा घटक असतो, जो पाण्यात विद्राव्य म्हणजेच विरघळणारा आहे. त्यावरून संशोधकांना वाटते की, हा लघुग्रह जुन्या काळातील एका महासागरयुक्त खगोलाचा भाग असावा, जो आता आपल्या सौरमालिकेत नाही.

SCROLL FOR NEXT