Ryugu Asteroid DNA Discovery | ‘रयुगु’ लघुग्रहावर आढळले ‘डीएनए’ तयार करणारे महत्त्वाचे घटक 
विश्वसंचार

Ryugu Asteroid DNA Discovery | ‘रयुगु’ लघुग्रहावर आढळले ‘डीएनए’ तयार करणारे महत्त्वाचे घटक

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली, या रहस्याचा उलगडा करण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांना एक मोठे यश मिळाले आहे. एका ‘धोकादायक’ मानल्या जाणार्‍या ‘रयुगु’ नावाच्या लघुग्रहावर ‘डीएनए’ तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व ‘Letters’ म्हणजेच मूलभूत घटक आढळले आहेत. यामुळे जीवसृष्टीसाठी लागणारे हे महत्त्वाचे घटक सूर्यमालेत सर्वत्र असू शकतात, अशी शक्यता बळावली आहे.

‘नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जपानच्या ‘हायाबुसा-2’ मोहिमेने रयुगु लघुग्रहावरून आणलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांना यामध्ये ‘कॅनोनिकल न्युक्लिओबेसेस’चा संच आढळला आहे. हे घटक ‘डीएनए’ आणि ‘आरएनए’ तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. रयुगु हा साधारण 900 मीटर व्यासाचा एक लघुग्रह असून त्याचा आकार फिरणार्‍या भोवर्‍यासारखा आहे. जपानच्या ‘JAMSTEC’ संस्थेचे जैव रसायनशास्त्रज्ञ तोशिकी कोगा यांच्या मते, याचा अर्थ रयुगुवर जीवसृष्टी होती असा होत नाही, तर आदिम लघुग्रह जीवसृष्टीच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असलेले रेणू तयार करू शकतात आणि ते जतन करून ठेवू शकतात, हे यातून सिद्ध होते.

लघुग्रहावर जीवसृष्टीचे घटक सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2023 मध्ये नासाच्या ‘ओसिरिस-रेक्स’ या यानाने ‘बेन्नू’ लघुग्रहावरून आणलेल्या नमुन्यांमध्येही हेच पाच न्यूक्लिओबेसेस आढळले होते. यापूर्वी पृथ्वीवर पडलेल्या काही उल्कांमध्येही असेच घटक सापडले आहेत. या सर्व पुराव्यांवरून असे दिसून येते की, जीवसृष्टीचे हे ‘बिल्डिंग ब्लॉक्स’ संपूर्ण सूर्यमालेत पसरलेले असू शकतात. पृथ्वीवर जीवसृष्टी नक्की कशी सुरू झाली, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये अजूनही एकमत नाही. काहींच्या मते ती समुद्राच्या तळाशी असलेल्या उष्ण झर्‍यांमधून निर्माण झाली, तर काहींच्या मते धूमकेतू किंवा लघुग्रहांद्वारे हे घटक पृथ्वीवर आले असावेत. स्पेनमधील खगोल जीवशास्त्रज्ञ सेसर मेनोर साल्वान यांच्या मते, हे घटक अवकाशात सापडले याचा अर्थ जीवसृष्टीची उत्पत्ती अवकाशात झाली असा होत नाही. मात्र, विश्वात कोणत्याही ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत कोणते सेंद्रिय पदार्थ तयार होऊ शकतात, याची स्पष्ट कल्पना आपल्याला या संशोधनातून मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT