मॉस्को : रशियात एका महिलेला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर करून चॅटजीपीटीद्वारे भुऱ्या, तपकिरी अस्वलाचा (Brown Bear) बनावटी फोटो तयार करणे चांगलेच महागात पडले आहे. या थट्टेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याने न्यायालयाने संबंधित महिलेला १५,००० रुबल (अंदाजे १७,०२१ रुपये) इतका भारी दंड ठोठावला आहे.
पूर्व रशियातील अमूर प्रांतातील मगदागाच्या वस्तीत राहणाऱ्या एका महिलेने सप्टेंबर महिन्यात ओपनएआयच्या ‘चॅटजीपीटी’ या एआय चॅटबॉटची मदत घेऊन एका रस्त्यावर मोठे तपकिरी अस्वल चालत असल्याचा फोटो तयार केला होता. हा फोटो तिने मस्करीत आपल्या एका मित्राला पाठवला होता. मात्र, बघता बघता हा फोटो मेसेजिंग अॅप्सवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि स्थानिक लोकांमध्ये परिसरात अस्वल फिरत असल्याचा गैरसमज निर्माण झाला. हा प्रकार अशा वेळी घडला जेव्हा रशियाच्या अनेक भागांत अस्वलाच्या धोकादायक हल्ल्यांमुळे आधीच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अस्वलाच्या हल्ल्यांत किमान २६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या ३० वर्षांत देशातील भुऱ्या अस्वलांची लोकसंख्या दुप्पट होऊन ३,०८,००० वर पोहोचली आहे.
फोटो व्हायरल झाल्यानंतर घाबरलेले नागरिक पोलिसांना फोन करू लागले. परिणामी, जिल्हाप्रमुखांनी त्या प्राण्याला शोधण्यासाठी तातडीने वाईल्डलाईफ रेंजर्सना (वन्यजीव पथक) कामाला लावले; प्रत्यक्षात मात्र तिथे कोणतेही अस्वल अस्तित्वातच नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने स्वतः पोलिसांना फोन करून तो फोटो एआयच्या मदतीने बनवलेला बनावटी फोटो असल्याचे कबूल केले. या प्रकरणी न्यायालयाने सुनावणी घेत महिलेला १५,००० रुबलचा दंड ठोठावला आहे. रशियात काही आठवड्यांच्या आत समोर आलेली ही दुसरी घटना आहे. रशियन कायदेशीर वृत्तसंस्था ‘रॅपसी’नुसार, सप्टेंबर महिन्यात पूर्व ट्रान्सबायकल प्रदेशातील एका अन्य महिलेवरही गावात अस्वलाचा बनावटी फोटो पोस्ट केल्याबद्दल ३०,००० रुबल (अंदाजे ३४,०२३ रुपये) दंड आकारण्यात आला होता.